Pakistan Batter Rape Accused: पाकिस्तानचा फलंदाज हैदर अलीला इंग्लंडमधील ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सदर प्रकरणाची दखल घेत त्याला तात्काळ निलंबित केले आहे. २३ जुलै रोजी हैदर अलीने मँचेस्टरमध्ये बलात्कार केल्याचा अहवाल सादर झाल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या २४ वर्षीय फलंदाजाला अटक करण्यात आली आहे.
ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी हैदर अलीच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
४ ऑगस्ट २०२५ रोजी बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. २३ जुलै २०२५ रोजी मँचेस्टरमधील एका परिसरात सदर गुन्हा घडल्याचे सांगितले जाते. आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र पुढील तपास होईपर्यंत जामीन देण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीचे नाव सांगितले नाही. ब्रिटिश पोलीस प्राथमिक तपासाच्या टप्प्यावर आरोपीचे नाव जाहीर करत नाहीत.
पोलिसांच्या कारवाईनंतर पीसीबीने तात्काळ याची दखल घेत हैदर अलीला संघातून निलंबित केल्याची घोषणा केली आहे. पीसीबीने आपल्या निवेदनात म्हटले, “संघातील प्रत्येक खेळाडूच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या कायदेशीर अधिकारांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चौकशीच्या प्रक्रियेदरम्यान हैदर अलीला आवश्यक असलेली कायदेशीर मदत दिली जाईल.”
कोण आहे हैदर अली?
हैदर अलीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पाकिस्तानच्या संघासाठी दोन एकदिवसीय सामने आणि ३५ टी-२० सामने खेळले होते. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानच्या शाहीन स्कॉड या अ संघासाठी त्याची नुकतीच निवड झाली होती. इंग्लंडचा हा दौरा २२ जुलै रोजी सुरू झाला होता.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारसंहितेच्या नियमानुसार, पुढील कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचेही पीसीबने आपल्या निवेदनात म्हटले आहे.