पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम-उल-हकला गंभीर दुखापत झाली आहे. राष्ट्रीय टी-२० चषक २०२१ च्या सामन्यादरम्यान इमामच्या बरगड्यांना दुखापत झाली. या घटनेमुळे काही काळ सामना थांबवावा लागला. नंतर त्याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आले. इमाम सध्या राष्ट्रीय टी-२० चषकात बलुचिस्तान संघाचा कर्णधार आहे.

इमामची टीम बलुचिस्तान दक्षिण पंजाबविरुद्ध होती. हा सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. या सामन्यात पंजाबचा फलंदाज शोएब मकसूदने मारलेला फटका वाचवण्यासाठी इमाम बाउंड्री बोर्डला धडकला. त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. या घटनेनंतर टीमचे फिजिओथेरपिस्ट मैदानावर पोहोचले. पण त्याला खूप वेदना होत होत्या. यानंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

दुखापतीमुळे इमाम बलुचिस्तानसाठी फलंदाजीसाठी आला नाही. मात्र, कर्णधाराच्या अनुपस्थितीतही संघाने चांगली कामगिरी केली आणि २ विकेट गमावून विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य गाठले. बलुचिस्तानच्या विजयात अब्दुल बंगालझाई आणि अब्दुल्ला शफीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. बंगालझाईने 7 चौकारांसह ५० धावा केल्या. त्याचबरोबर शफीकनेही २८ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. तो बाद झाल्यानंतर हरीस सोहेलने ३५ चेंडूत ४७ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

राष्ट्रीय टी-२० चषकातील इमामच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तो ४ डावांमध्ये फक्त ४१ धावा करू शकला आहे. त्यांचा संघ बलुचिस्तान सध्या ४ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघासोबत इमाम होता. तेथे त्याला ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. इमामने मालिकेच्या तिसऱ्या वनडेमध्ये ५६ धावा केल्या होत्या. इमाम पाकिस्तानसाठी ११ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि २ टी-२० खेळला आहे.