भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला भेटल्यानंतर पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहनवाज दहानीने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. २०२१च्या टी-२० विश्वचषकादरम्यान धोनीला भेटणे हे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते, जे मी कधीही विसरणार नाही, असे दहानीने म्हटले आहे. याशिवाय त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
२०२१ टी-२० विश्वचषकादरम्यान शाहनवाज दहानी धोनीला भेटला होता. धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून टी-२० विश्वचषक स्पर्धेत होता. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शाहनवाज दहानी धोनीला भेटला. त्याआधी पाकिस्तानी संघ सराव करत असतानाही त्याने धोनीची भेट घेतली होती. धोनी मैदानाबाहेर जात असताना दहानीने त्याला मैदानावरून हाक मारली.
हेही वाचा – IND vs SL : १००वा कसोटी सामना खेळण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का!
आता दहानीने धोनीसोबतच्या भेटीचा उल्लेख केला आहे. क्रिकेट पाकिस्तानसोबतच्या खास संवादात तो म्हणाला, “मला महेंद्रसिंह धोनीचा स्तर सांगायला खूप वेळ लागेल. त्याला भेटणे माझ्यासाठी स्वप्नवत झाल्यासारखे होते. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. त्याने मला अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आयुष्याविषयीच्या गोष्टी. जगणे कसे आणि मोठ्यांचा आदर कसा करायचा याबद्दल गोष्टी सांगितल्या. धोनीने मला सांगितले, की क्रिकेटमध्ये चांगले आणि वाईट दिवस येतील पण तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल आणि तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या खेळासाठी समर्पित असले पाहिजे.”