जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी दुसऱ्या डावात सहाव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी धडाकेबाज कागगिरी केली. तरीही दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी इंग्लंडची जोडी फोडण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानी गोलंदाजांना याचा फटका बसला. या पराभवानंतर माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या संघातील खेळाडूंना कानपिचक्या दिल्या आहेत. दुसऱ्या डावात पाकिस्तानी गोलंदाजांनी पुरेसा आक्रमक मारा केला नसल्याचं शोएब म्हणाला.

अवश्य वाचा – इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावूनही बटलर आपल्या कामगिरीवर नाखुश, कारण…

“पाकिस्तानला दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आली होती, पण आमच्या खेळाडूंची फाळणीपासून सुरु असलेली चूक पुन्हा केली. फलंदाजांनी दुसऱ्या डावात पुरती निराशा केली. संघाला भागीदारीची गरज होती, जिथे खराब चेंडू असेल तिकडेच फटके खेळणं गरजेचं होतं. पाकिस्तानी खेळाडूंकडे दुसऱ्या डावात ३००-४०० धावा करत इंग्लंडला मोठं आव्हान देण्याची चांगली संधी होती. पण एकाही पाकिस्तानी स्टार खेळाडूला धावा काढता आल्या नाहीत. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचं नाव मोठं करायचं असेल तर अशा संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. पहिल्या डावात १०७ धावांची आघाडी घेऊनही जर त्याचा फायदा उचलता येणार नसेल तर तुमचा काहीच उपयोग नाही.” इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या यू-ट्युब चॅनलवर विश्लेषण करत असताना अख्तरने आपलं मत मांडलं.

शान मसूदने केलेल्या खेळीबद्दल शोएब म्हणाला, “दुसऱ्या डावात शान दुर्दैवी ठरला, पण त्याने त्याची जबाबदारी पूर्ण केली होती. असाद शफीक धावबाद झाला…ही देखील त्याचीच चूक होती. बाबर आझमला इथे चांगली खेळी करणं अपेक्षित होतं. तुम्ही कितीही चांगले खेळाडू असाल, त्या पद्धतीचा खेळ तुमच्याकडून होणार नसेल तर काय अर्थ?? जर पहिल्या डावात पाकिस्तानकडे आघाडी नसती तर संघाची अवस्था अधिकच खराब झाली असती. फलंदाज म्हणून कामगिरी कशी सुधारायची याचा अभ्यास पाकिस्तानी खेळाडूंना करावा लागणार आहे.” ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करावं लागणार आहे.

अवश्य वाचा – Eng vs Pak : बटलर-वोक्स जोडीचा पाकिस्तानला दणका, पहिल्या कसोटीत इंग्लंड विजयी