मुंबई : आरबीएल बँकेच्या दक्षता विभागाच्या तक्रारीवरून गुरूग्राम, मुंबई, राजकोट आणि अहमदाबाद येथील बँकेच्या सात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ११ जणांविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बँकेची १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बँकेचे क्रेडिट कार्ड विकण्याच्या बहाण्याने दलालांना अतिरिक्त दलाली दिली. फसवणुकीसाठी आरोपींनी अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट दलालांच्या नावाने क्रेडिट कार्ड विकल्याचा आरोप आहे.
आरबीएल बँकेचे सहाय्यक उपाध्यक्ष (दक्षता विभाग) विक्रांत कदम यांच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, फौजदारी विश्वासघात अशा विविध कलमांतर्गत राष्ट्रीय प्रमख (क्रेडिटकार्ड विभाग, गुरूग्राम) रुधीर सरीन यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. त्यात काही विभागीय अधिकाऱ्यांसह दलालांचा समावेश आहे. क्रेडिटकार्ड विक्रीचे लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण करण्यासाठी थेट विक्री दलालांची नियुक्ती केली जाते.
हेही वाचा…कोकणातील वंदे भारतचा प्रवास दोन तासांनी वाढणार
तक्रारीनुसार, २०२१ मध्ये आरबीएल बँकेचे दक्षता अधिकारी दुर्गादास रेगे यांना एक तक्रार प्राप्त झाली होती. त्यात काही अधिकारी अशा दलालांकडून बेकायदेशीर परतावा स्वीकारत असल्याचे म्हटले होते. बँकेने तात्काळ याप्रकरणी पडताळणी केली असता आरोपांमध्ये तथ्य आढळले. काही अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावर दलालांकडून रक्कम जमा झाल्याचे आढळून आले. काही प्रकरणांमध्ये बनावट दलालही दाखवण्यात आले होते. त्याअंतर्गत १२ कोटी दोन लाख ७५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. त्यात सरीन यांच्यासह सात अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. हा अपहार करण्यासाठी १२ दलालांचा वापर करण्यात आल्याचे बँकेच्या पडताळणीत समजले.
प्राथमिक तपासणीत या अधिकाऱ्यांनी दलालांना अतिरिक्त रक्कम दिल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्या बदल्यात दलालांकडून चार कोटी २९ लाख रुपये स्वीकारले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या तपासणीत एका दलालासोबत एक अधिकारी बँकेत रक्कम काढण्यासाठीही गेल्याचे आढळले. या संपूर्ण गैरप्रकारामुळे आरबीएल बँकेचे १२ कोटी दोन लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. बँकेने स्वतः तपासणी करून हा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.