जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी दुसऱ्या डावात केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर यजमान इंग्लंडने मँचेस्टर कसोटीत पाकिस्तानवर ३ गडी राखून मात केली. दुसऱ्या डावात विजयासाठी २७७ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. परंतू मधल्या फळीत जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे चौथ्याच दिवशी सामन्याचा निकाल लागला. वोक्स आणि बटलर जोडीने झळकावलेली अर्धशतकं हे इंग्लंडच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. बटलरने दुसऱ्या डावात ७५ तर ख्रिस वोक्सने नाबाद ८४ धावा करत संघाच्या विजायत मोलाचा वाटा उचलला.

संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावल्यानंतरही बटवर स्वतःच्या कामगिरीवर नाराज आहे. यामागचं कारण आहे यष्टीरक्षणात त्याने केलेली ढिसाळ कामगिरी…महत्वाची गोष्ट म्हणजे बटलरनेही आपलं यष्टीरक्षण योग्य पद्धतीने झालं नसल्याचं मान्य केलं. “मला माहिती आहे, मी खूप खराब यष्टीरक्षण केलं आहे. मी खूप सोप्या संधी दवडल्या. या पातळीवर तुमच्याकडून ही अपेक्षा नसते मग तुम्ही कितीही धावा करा…तुमची कामगिरी ही चांगलीच झाली पाहिजे, मला याची पुरेपूर कल्पना आहे. जर आज धावा केल्या नाहीतर तर हा माझा शेवटचा सामना असेल असा विचारही माझ्या मनात येऊन गेला. त्यामुळे मी यष्टीरक्षणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.” सामना संपल्यानंतर Sky Sports वाहिनीशी बोलताना बटलरने आपली प्रतिक्रीया दिली.

पहिल्या डावात पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमणाचा अंदाज घेत इंग्लंडने दुसऱ्या डावात सावध सुरुवात केली. सलामीवीर रोरी बर्न्सला स्वस्तात माघारी धाडण्यात पाकिस्तानी गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर डोम सिबली आणि कर्णधार जो रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी केली. सिबलीला बाद करत यासिर शहराने पाकिस्तानला दुसरा महत्वाचा ब्रेक-थ्रू मिळवून दिला. यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी परत निराशा केली. अखेरीस चौथ्या दिवशी जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी धडाकेबाज खेळी करत पाकिस्तानच्या हातातून विजय हिसकावून घेतला. ११७-५ अशी परिस्थिती असताना बटलर आणि वोक्स जोडीने सहाव्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे पाकिस्तान सामन्यात बॅकफूटला ढकललं गेलं.

यासिर शहाने ७५ धावांवर बटलरला आणि त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडला माघारी धाडत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ख्रिस वोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीने विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बटलरने १०१ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ७५ धावा केल्या. यानंतर ख्रिस वोक्सनेही मैदानात अखेरपर्यंत टिकून राहत नाबाद ८४ धावा काढत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावातही फिरकीपटू यासिर शहाने ४ बळी घेत आपली चमक दाखवली. मात्र मोक्याच्या क्षणी इंग्लंडची जोडी फोडण्यात अयशस्वी ठरल्यामुळे पाकिस्तानला हातात आलेल्या विजयाचा गमवावा लागला.