IND A vs PAK A Saad Masood Agressive Send off to naman dhir video: रायझिंग स्टार्स आशिया चषक २०२५ मध्ये भारत अ संघाला पाकिस्तान शाहीन्स संघाने ८ विकेट्सने पराभूत केलं. या सामन्यादरम्यान कॅचवरून मोठा गदारोळ झाला होता, ज्याच्यावरून सध्या चर्चा सुरू आहेत. पण या सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या गोलंदाजाने नमन धीरला बाद केल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केलं. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भारतीय संघाच्या डावात प्रियांश आर्या बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी व नमन धीर यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही ४९ धावांची भागीदारी रचत संघाच्या धावांमध्ये भर घालत होते. नमन धीर २० चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा करत खेळत होता. पण या दरम्यान तो ९व्या षटकात झेलबाद झाला.
साद मसूद व नमन धीरमध्ये मैदानावर काय घडलं?
नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नमन बाद झाला. वैभव सूर्यवंशीने सादच्या या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. नमनने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढच्या चेंडूवर नमनने पुन्हा एकदा फटका खेळला, पण एक्स्ट्रा कव्हरवर इरफान खानने त्याला झेलबाद केलं. त्यानंतर साद मसूदने त्याच्याकडे रागाने पाहून ए निघ म्हणत हातवारे करत मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला, यानंतर त्याने शिवीगाळही केली. नमन धीर जळता कटाक्ष त्याच्याकडे टाकत मैदानाबाहेर गेला.
साद मसूदच्या कृतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, पंचांनी पाकिस्तानी खेळाडूला समज दिल्याचं देखील दिसत आहे. नमन धीर बाद झाल्यानंतर काही वेळाने वैभव सूर्यवंशी देखील बाद झाला आणि नंतर भारताचा डाव कोसळला आणि संघ फक्त १३६ धावाच करू शकला.
रायझिंग स्टार आशिया चषक सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार इरफान खानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा वेगाने धावा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा साथीदार प्रियांश आर्य मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो नऊ चेंडूत दोन चौकारांसह १० धावा करत बाद झाला. सूर्यवंशी आणि नमन यांनी मिळून पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाला ५० धावांपर्यंत पोहोचवलं. पण यानंतर भारताचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.
