सीमेवर झालेल्या तणावामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे महिला विश्वचषकातील सामने कुठे खेळवायचे हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळापुढील (बीसीसीआय) प्रश्न निकालात निघाला आहे. पाकिस्तानी क्रिकेट सामने खेळवायचा निर्णय कटक येथे झाला असल्याने साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गुरुवारी बीसीसीआय आणि आयसीसी पाकिस्तानच्या संघाच्या सामन्यांबाबत विचारविनिमय करत होते. त्यावेळी ओडिशा क्रिकेट असोसिएशनने सामने कटकला खेळवण्यास हरकत नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार स्पर्धा संचालक सुरू नायक यांनी हे सामने कटकला खेळवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ‘अ’ गटाचे सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसार मुंबईत होणार आहेत, तर ‘ब’ गटाचे सामने कटकला खेळवण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.