डॅरेन ब्राव्होने झुंजार शतकी खेळी साकारत वेस्ट इंडिजच्या आशा तेवत ठेवल्या. त्यामुळे गुलाबी चेंडूसह खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याची रंगत अखेपर्यंत टिकली. शेवटी पाकिस्तानने दुबईतील या पहिल्या कसोटीत ५६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली.
पाकिस्तानच्या विजयाच्या मार्गावर ब्राव्हो पहाडासारखा उभा राहिला. त्याने ४१० मिनिटे किल्ला लढवत ११६ धावांची चिवट खेळी उभारली. लेग-स्पिनर यासिर शाहने स्वत:च्याच गोलंदाजीवर दोन्ही हात सरसावत सुरेख झेल टिपला आणि त्याच्या खेळीपुढे पूर्णविराम दिला. ब्राव्हो पॅव्हेलियनकडे परतण्यापूर्वी स्तब्धपणे मैदानावर थांबला. त्याचा विश्वास बसायला एक मिनिट गेले. तो अधिक काळ मैदानावर थांबला असता, तर वेस्ट इंडिज जिंकला असता किंवा ही लढत अनिर्णीत राहिली असती. त्यानंतर पाचव्या दिवसाचा खेळ संपण्यास फक्त १२ षटके शिल्लक असताना वेस्ट इंडिजचा डाव २८९ धावांत आटोपला.
ब्राव्होने आपल्या कसोटी कारकीर्दीतील आठवे शतक साकारताना आठ चौकार आणि एक षटकार खेचला. विजयासाठी ३४६ धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने ब्राव्होच्या बळावरच स्वीकारले होते. तो बाद झाला तेव्हा त्यांना विजयासाठी ८३ धावांची आवश्यकता होती, तर सामना अनिर्णीत राखण्यासाठी २७ षटके खेळून काढण्याची गरज होती.
डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाझने देवेंद्र बिशूला पायचीत केले, तर मिग्युएल कमिन्स आणि शेनॉन गॅब्रिएल धावचीत झाले. मग पाकिस्तानने या संस्मरणीय विजयाचा जल्लोष साजरा केला. वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने ६३ धावांत ३ बळी घेतले, तर शाहने ११३ धावांत २ बळी घेतले. ही कसोटी अझर अलीचे त्रिशतक (नाबाद ३०२), लेग-स्पिनर बिशूची प्रभावी गोलंदाजी (४९ धावांत ८ बळी) आणि ब्राव्होच्या दोन्ही डावांतील झुंजार खेळी यामुळे वैशिष्टय़पूर्ण ठरली. परंतु सामनावीर किताबावर अझरनेच नाव कोरले. १९५२ मध्ये कसोटी क्रिकेटला प्रारंभ करणाऱ्या पाकिस्तानच्या कारकीर्दीतील हा ४००वा सामना होता.
संक्षिप्त धावफलक
- पाकिस्तान (पहिला डाव) : ३ बाद ५७९ (डाव घोषित)
- वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ३५७
- पाकिस्तान (दुसरा डाव) : १२३
- वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : १०९ षटकांत सर्व बाद २८९ (डॅरेन ब्राव्हो ११६, जेसन होल्डर ४०; मोहम्मद आमीर ३/६३)
ब्राव्होची झुंज अपयशी
- ११६ धावा
- २४९ चेंडू
- १० चौकार
- १ षटकार