वर्ल्डकप स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू नये यासाठी पाकिस्तानला आज चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जिंकणं आवश्यक आहे. या महत्त्वपूर्ण लढतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज हसन अली आजारी असल्यामुळे मोहम्मद वासिम ज्युनियर हा संघात परतला आहे. फिरकीपटू उसमा मीरऐवजी मोहम्मद नवाझला संधी मिळाली आहे.

पाकिस्तानने नेदरलँड्स आणि श्रीलंकेला नमवत चांगली सुरुवात केली पण त्यानंतर त्यांना यजमान भारतीय संघ, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. आणखी एक पराभव झाला तर पाकिस्तानला बाद फेरी गाठणं कठीण होईल. ते लक्षात घेता आफ्रिकेविरुद्धची लढत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघात तीन बदल पाहायला मिळत आहेत. पोटाच्या प्रकृतीमुळे दोन लढतीत खेळू न शकलेला कर्णधार तेंबा बावूमाचं संघात पुनरागमन झालं आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी लुंगी एन्गिडीचा संघात समावेश करण्यात आला आहे. लिझाड विल्यम्सऐवजी डावखुरा फिरकीपटू तबरेझ शम्सी खेळणार आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देण्यासाठी ओळखली जाते. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांनी फिरकीपटूंचा भरणा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सविरुद्ध धक्कादायक पराभव झाला पण त्यानंतर मात्र त्यांनी दमदार खेळ करत टॉप४ साठी दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. १९९९ नंतर दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध जिंकता आलेलं नाही. ही आकडेवारी बाजूला सारत पाकिस्तानला चीतपट करण्याकरता आफ्रिकेचा संघ उत्सुक आहे.