‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ हेच ब्रीदवाक्य जोपासल्यामुळे व्यावसायिक पुरुष विभागात एअर इंडियाला आणि महिला विभागात पुण्याच्या एम. डी. स्पोर्ट्स क्लबला पांचगणी व्यायाम मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत विजेतेपदावर नाव कोरता आले. पुरुषांच्या अंतिम फेरीत एअर इंडियाने गतविजेत्या मुंबई बंदरच्या दिगंबर जाधव आणि विष्णू जाधव या महत्त्वाच्या खेळाडूंना मैदानाबाहेर ठेवण्याची चाल यशस्वी ठरली. नेमक्या तशाच प्रकारची व्यूहरचना एमडी संघाने प्रतिस्पर्धी शिवाई क्रीडा मंडळाची राष्ट्रीय खेळाडू शीतल मारणेसाठी रचली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात योगेश झुडेने बोनस गुणानिशी आपले खाते उघडले. मग अखेपर्यंत योगेशच्या आवेशपूर्ण चढायांनी रंगत आणली. परंतु मुंबई बंदरचा हुकमी एक्का विष्णू जाधवची पहिल्या सत्रात दोनदा पकड झाली. त्याचप्रमाणे दिगंबर जाधवचीही एअर इंडिया संघाने पकड केल्यामुळे पहिल्या सत्रात एअर इंडियाकडे ७-४ अशी आघाडी होती. जाधव जोडगोळी मैदानाबाहेर राहिल्याने मुंबई बंदरच्या चढाई आणि पकडीमधील हवाच निघून गेली. त्यानंतर एअर इंडियाने कोणताही धोका न पत्करता हे दोघे अखेपर्यंत मैदानाबाहेर राहतील, याची काळजी घेतली आणि ८-४ अशा फरकाने अजिंक्यपदावर मोहोर उमटवली. एअर इंडियाकडून गिरीश इरनाकने प्रेक्षणीय पकडी केल्या.
महिलांच्या अंतिम फेरीत शीतल मारणेने पहिल्या चार चढायांमध्ये ४ गुण घेत शिवाई ५-२ अशी आघाडी मिळवून दिली. शिवाईचे यश शीतलवर अवलंबून आहे, हे पक्के ठाऊक असल्याने लविना गायकवाडने शीतलचीच पकड केली. त्यानंतर एम. डी. स्पोर्ट्स क्लबने डोके वर काढले आणि मध्यंतराला ७-७ अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्रात एमडीने सावध खेळ करीत शीतलला मैदानाबाहेर ठेवले. मग अखेरची तीन मिनिटे शिल्लक असताना जोखीम पत्करत लविनाने चढाईत एक गुण मिळवला आणि अखेरच्या मिनिटाला एमडीने पकडीचा गुण मिळवत ९-७ असा विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यावसायिक पुरुष विभाग
मालिकावीर : विष्णू जाधव (मुंबई बंदर)
सर्वोत्तम चढाईपटू : योगेश झुडे (एअर इंडिया)
सर्वोत्तम पकडपटू : गिरीश इरनाक (एअर इंडिया)
महिला विभाग
मालिकावीर : लविना गायकवाड (एमडी)
सर्वोत्तम चढाईपटू : शीतल मारणे (शिवाई)
सर्वोत्तम पकडपटू : प्राजक्ता तापकीर (एमडी)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchgani state kabaddi tournament air india win male section final
First published on: 23-01-2014 at 01:52 IST