scorecardresearch

पंकज अडवाणीचे ऐतिहासिक जेतेपद

अंतिम लढतीत त्याने मलेशियाच्या किन होह मोहचा ७-५ असा पराभव केला.

पंकज अडवाणीचे ऐतिहासिक जेतेपद

भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने अबू धाबी येथे सुरू असलेल्या आशियाई ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत जेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक आणि आशिया खंडातील ६-रेड स्नूकरचे अजिंक्यपद पटकावणारा पंकज हा पहिला खेळाडू ठरला आहे. अंतिम लढतीत त्याने मलेशियाच्या किन होह मोहचा ७-५ असा पराभव केला.

उपांत्य फेरीत भारताच्या आदित्य मेहतावर ६-१ असा विजय मिळवून खंडातील पहिल्या जेतेपदाच्या दिशेने कूच केलेल्या पंकजने अंतिम फेरीत धडाक्यात सुरूवात केली. पहिल्या फ्रेममध्ये त्याने ३९-४ असा विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली, परंतु मोहने दुसऱ्या फ्रेममध्ये ५१ गुणांचा ब्रेक करून ५१-६ अशी सरशी साधताना सामना १-१ असा बरोबरीत आणला. तिसरी फ्रेम पंकजने (४०-१४), तर चौथी फ्रेम मोहने (३७-०) जिंकून सामना २-२ असा बरोबरीत राखला. पाचव्या आणि सहाव्या फ्रेममध्ये पंकजने सर्व अनुभव पणाला लावताना ४१-७ व ४४-८ अशी बाजी मारून ४-२ अशी आघाडी घेतली. चिकाटीने खेळ करणाऱ्या मोहने सातव्या फ्रेममध्ये विजय मिळवत गुणांचे अंतर कमी केले, परंतु पंकजने ४५ ब्रेक गुणांसह आठवी फ्रेक खिशात घातली. नवव्या फ्रेममध्ये दोघांमध्ये रंगलेली चुरस प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी होती. दहाव्या फ्रेममध्ये पंकजने ४५-३६ अशी बाजी मारून दोन गुणांची आघाडी घेतली. अकराव्या फ्रेममध्ये मोहने विजय मिळवताना सामन्यातीत चुरस अधिक वाढवली, परंतु निर्णायक फ्रेममध्ये पंकजने ५३-२४ अशा विजयासह जेतेपद आपलेसे केले. पंकजने ७-५ अशा फरकाने मोहचे कडवे आव्हान परतवून लावले.

दरम्यान, भारतीय संघाने कतारवर ३-० असा सोपा विजय मिळवत सांघिक गटाच्या बाद फेरीत प्रवेश केला. पंकज अडवाणी व मनन चंद्रा यांनी एकेरीत अनुक्रमे अहमद सैफ व मोहसीन कुशैषा यांचा पराभव केला. दुहेरीतही पंकज व मनन या जोडीने अहमद व अली अ‍ॅलोबैदलीचा पराभव करून भारताला पुढील फेरीत प्रवेश मिळवून दिला.

आशियाई स्नूकर स्पध्रेतील हे माझे पहिले वैयक्तिक जेतेपद आहे आणि त्यामुळे हे स्वप्नवत वाटत आहे. गेल्या महिन्यात १५-रेड आशियाई स्नूकर अजिंक्यपदाने हुलकावणी दिल्यानंतर या विजयाने दिलासा मिळाला आहे.

– पंकज अडवाणी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-05-2016 at 05:37 IST

संबंधित बातम्या