धरमशाला : ऋषभ पंतकडे गुणवत्ता आहे; परंतु भविष्यात भारताचा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा क्रिकेटपटू होण्यासाठी स्वत:च्या आणि अन्य क्रिकेटपटूंच्या चुकांमधूनही त्याने शिकवण घेण्याची गरज आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर यांनी व्यक्त केले.
पंतने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २२.९० आणि ट्वेन्टी-२० प्रकारात २१.५७ सरासरी राखली आहे. डावखुऱ्या पंतकडे गुणवत्ता असली तरी खराब फटक्यांच्या निवडीमुळे नुकसान होत आहे, असा इशारा ४८ वर्षीय क्लुसनर यांनी दिला आहे. क्लुसनर यांनी ४९ कसोटी आणि १७१ एकदिवसीय सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे.
‘‘स्वत:च्या चुकांमधून शिकण्याची प्रक्रिया अतिशय आव्हानात्मक असते. त्याला बराच वेळ लागतो. त्यामुळेच मी पंतला अन्य खेळाडूंच्या चुकांमधून शिकण्याची झटपट प्रक्रिया सांगितली आहे,’’ असे क्लुसनर या वेळी म्हणाले.