नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावलेल्या दीपा मलिकला तिच्या प्रेरणादायी कामगिरीबद्दल यंदाच्या वर्षीची न्यूझीलंड पंतप्रधानांकडून सर एडमंड हिलरी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

४८ वर्षीय दीपाने २०१६च्या रिओ पॅरालिम्पिकमधील गोळाफेक (एफ ५३) प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. तिला ही शिष्यवृत्ती भारत आणि न्यूझीलंडमधील नागरिकांच्या स्नेहसंबंधात सुधारणा व्हावी आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने देण्यात येणार आहे.

‘‘भारताच्या दीपाला ही शिष्यवृत्ती जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेर्न यांनी दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट होण्याच्या उद्देशाने ती जाहीर केली आहे,’’ असे न्यूझीलंडच्या उच्चायुक्त जोन्ना केम्पकर्स यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

खडतर झुंज

दीपा जेव्हा ३६ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या कण्यामध्ये एक मोठी गाठ आढळून आली. त्यामुळे त्यांना चालणेदेखील अशक्य झाले. शस्त्रक्रिया करूनदेखील त्यांना व्हिलचेअरचाच आधार घ्यावा लागला.

त्यानंतर दीपाने जिद्दीने परिस्थितीचा सामना करीत गोळाफेकवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर दीपाने २०१०, २०१४ आणि २०१८ अशा तिन्ही आशियाई पॅरालिम्पिक प्रकारात पदक मिळवले. तसेच २०११ मध्ये न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चला झालेल्या जागतिक पॅराअ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही रौप्यपदक मिळवले होते. त्याशिवाय भारत सरकारने दीपाला पद्मश्री आणि अर्जुन यासारखे प्रतिष्ठीत पुरस्कार देऊनदेखील गौरवले आहे.