गतविजेत्या यू मुंबाला हरवून विजयी सलामी नोंदवणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सच्या पदरी सोमवारी निराशा पडली. अखेरच्या निर्णायक चढाईत जसवीर सिंग अपयशी ठरला आणि पाटणा पायरेट्सने २९-२८ अशा फरकाने स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमध्ये आपल्या पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. याचप्रमाणे तेलुगू टायटन्सने दबंग दिल्लीला ४५-३४ असे आरामात हरवून दुसऱ्या विजयाची नोंद केली.
राजीव गांधी क्रीडा संकुलात चालू असलेल्या या स्पध्रेतील पहिला सामना पहिल्या चढाईपासून रंगत वाढवणारा ठरला. मध्यंतराला पाटण्याने १४-१२ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात प्रदीप नरवालने दोनदा तीन गुण मिळवण्याचा पराक्रम दाखवला आणि क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले. चढायांचे ९ आणि पकडींचे २ असे सर्वाधिक ११ गुण प्रदीपने मिळवले. तर संदीप नरवाल आणि सुनील कुमार यांनी अप्रतिम पकडी केल्या. जयपूरकडून तीन बोनस गुणांसह जसवीरने ११ गुण प्राप्त केले. जयपूरच्या बचावफळीतील महत्त्वाचा आधारस्तंभ रोहित राणाचे अपयश पाटण्याच्या पथ्यावर पडले.
दुसऱ्या लढतीत तेलुगू टायटन्सने सातव्या मिनिटाला पहिला लोण चढवून सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. नंतर २०व्या मिनिटाला दुसरा लोण चढवत हा सामना एकतर्फी होण्याचे संकेत दिले. कारण मध्यंतराला टायटन्सकडे २६-१० अशी आघाडी होती. परंतु दुसऱ्या सत्रात दिल्लीने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आणि ३२व्या मिनिटाला एक लोणही दिला. परंतु राहुल चौधरी आणि रोहित बलियान (प्रत्येकी ११ गुण) यांच्या चढायांपुढे दिल्लीच्या बचावाचा निभाव लागला नाही. दिल्लीकडून काशिलिंग आडके (१२ गुण) आणि सूरजित सिंग (१० गुण) यांनी झुंजार खेळ केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा सामना
तेलुगू टायटन्स वि. बंगाल वॉरियर्स
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासूनथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३ आणि एचडी २, ३

वीर नरवाल दौडले सात
पाटणा आणि जयपूर यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांत मिळून नरवाल आडनावाचे सात खेळाडू होते. पाटण्याच्या संघात संदीप, दीपक, महिपाल, प्रदीप आणि राकेश अशा पाच खेळाडूंचा समावेश होता, तर जयपूरच्या संघात सोनू आणि राजेशचा समावेश होता. पाटण्याच्या नरवाल बंधूंनी २९ पैकी १६ गुणांची कमाई करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर जयपूरच्या नरवाल बंधूंनी २८ पैकी ४ गुण कमवले. त्यामुळे एकंदर या सामन्यात वीर नरवाल मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावली

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patna pirates thrilling victory on jaipur pink panthers
First published on: 02-02-2016 at 05:37 IST