पुढील महिन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी इंग्लंडचा अव्वल फलंदाज केव्हिन पीटरसन याला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र एकदिवसीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वादग्रस्त प्रकारानंतर पीटरसनने इंग्लंड संघातील स्थान गमावले होते. मात्र भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली. पण पुणे येथे २० डिसेंबरला आणि मुंबईत २२ डिसेंबरला होणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी मात्र १३ जणांच्या इंग्लंड संघात पीटरसनला स्थान देण्यात आले नाही. मात्र ११ जानेवारीपासून राजकोट येथे सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसठी त्याची इंग्लंड संघात निवड करण्यात आली आहे.
रोटेशन पद्धतीनुसार ऑफस्पिनर ग्रॅमी स्वान याला ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिन फक्त एकदिवसीय मालिकेत खेळेल. स्टुअर्ट ब्रॉड ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी इंग्लंड संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. वेगवान गोलंदाज याची दोन सराव सामने आणि पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली आहे. उर्वरित दोन सामन्यांसाठी स्टुअर्ट ब्रॉडला संधी देण्यात आली आहे. खेळाडूंवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही रोटेशन पद्धत अवलंबणार आहोत, असे निवड समितीचे अध्यक्ष जेफ मिलर यांनी सांगितले.
 इंग्लंड ट्वेन्टी-२० संघ : स्टुअर्ट ब्रॉड (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, टिम ब्रेस्नन, डॅनी ब्रिग्स, जोस बटलर, जेड डेर्नबॅच, अ‍ॅलेक्स हेल्स, मायकेल लम्ब, स्टुअर्ट मीकर, इऑन मॉर्गन, समित पटेल, जेम्स ट्रेडवेल, ल्युक राइट.
 इंग्लंड एकदिवसीय संघ : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, इयान बेल, टिम ब्रेस्नन, डॅनी ब्रिग्स, जेड डेर्नबॅच, स्टीव्हन फिन, क्रेग किस्वेटर, स्टुअर्ट मीकर, इऑन मॉर्गन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, जेम्स ट्रेडवेल, जोनाथन ट्रॉट, जेम्स अ‍ॅन्डरसन/स्टुअर्ट ब्रॉड.