Phil Salt Catch: इंग्लंडमध्ये द हंड्रेड लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील २० वा सामना मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ट्रेंट रॉकेट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स संघाचा कर्णधार फिल सॉल्टने हवेत डाईव्ह मारून एका हाताने अविश्वसनीय झेल घेत, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही या झेलवर विश्वास बसत नव्हता. या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, मँचेस्टर ओरिजिनल्स संघाची गोलंदाजी सुरू असताना जोश टंग गोलंदाजी करत होता. त्यावेळी टंगने या डावातील ४८ वा चेंडू टाकला. त्यावेळी ट्रेंट रॉकेट्स संघाकडून मॅक्स होल्डन फलंदाजी करत होता. होल्डनने हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटला लागताच हवेत गेला. त्यावेळी मँचेस्टर ओरिजिनल्स संघाचा कर्णधार फिल सॉल्ट ३० यार्ड सर्कलच्या आत फलंदाजी करत होता. हा चेंडू त्याच्यापासून दूर जात होता. पण त्याने डाईव्ह मारली आणि दमदार झेल घेतला.
या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स संघाला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं. प्रथम फलंदाजी करताना मँचेस्टर ओरिजिनल्स संघाला १०० चेंडूत ८ गडी बाद ९८ धावा करता आल्या. ट्रेंट रॉकेट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी ९९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ट्रेंट रॉकेट्स संघाने ७४ चेंडूत दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि ७ गडी राखून विजयाची नोंद केली. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रेहान अहमदने ३५ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची तुफानी खेळी केली. फलंदाजीसह रेहानने गोलंदाजी करतानाही २ गडी बाद केले. या दमदार कामगिरीसह त्याने आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
या हंगामात ट्रेंट रॉकेट्स संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. डेव्हिड विलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने ५ पैकी ४ सामन्यांमध्ये विजयाची नोंद केली आहे. केवळ एका सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या हा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर फिल सॉल्टच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने ६ पैकी केवळ २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर १६ गुणांसह ओव्हल इन्विंसिबल्सचा संघ १६ गुणांसह या यादीत अव्वल स्थानी आहे.