ऑस्ट्रेलियाविरुद्ध सप्टेंबरअखेरीस प्रकाशझोतातील सामन्याचे आयोजन

भारतीय महिला क्रिकेट संघ या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून त्यांचा पहिलावहिला गुलाबी चेंडूतील कसोटी सामना ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत खेळवला जाणार आहे.

पर्थ येथे अद्याप प्रकाशझोतातील एकही कसोटी सामना खेळवण्यात आला नाही. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडूतील कसोटी पर्थ येथेच खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघटनेशी चर्चा केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे.

‘‘महिला क्रिकेटप्रतीची बांधिलकी जपत आम्ही भारतीय महिला संघाच्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्याची घोषणा करत आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या वर्षी भारतीय महिलांचा पहिलावहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येईल,’’ असे शाह यांनी सांगितले.

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध १६ जूनपासून सात वर्षांनंतर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने तसेच तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा हा कसोटी सामना महिला क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा प्रकाशझोतातील सामना ठरणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात नोव्हेंबर २०१७मध्ये सिडनी येथे गुलाबी चेंडूतील कसोटी सामना खेळवण्यात आला होता.

आधी देशांतर्गत प्रकाशझोतातील कसोटी खेळवा -रंगास्वामी

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गुलाबी चेंडूतील कसोटी सामन्याआधी सराव म्हणून देशांतर्गत सामना आयोजित करण्यात यावा, अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारी परिषदेच्या सदस्या तसेच माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, ‘‘गेल्या वर्षी महिला क्रिकेटपटूंसाठी काही स्पर्धाचे आयोजन करण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार होता. पण करोनामुळे संपूर्ण वर्ष वाया गेले. भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामना तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रकाशझोतातील कसोटी खेळणार असल्याने आनंद झाला.’’

बऱ्याच महिन्यांनंतर आम्हाला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आव्हानासाठी सज्ज होईल. दुसऱ्यांदा गुलाबी चेंडूतील कसोटी सामना खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.  – मेग लॅनिंग, ऑस्ट्रेलियाची कर्णधार

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक

१९ सप्टेंबर     पहिला एकदिवसीय       नॉर्थ सिडनी ओव्हल

२२ सप्टेंबर     दुसरा एकदिवसीय जंक्शन ओव्हल

२४ सप्टेंबर     तिसरा एकदिवसीय       जंक्शन ओव्हल

३० सप्टें-३ ऑक्टो प्रकाशझोतातील कसोटी    वाका मैदान

७ ऑक्टोबर     पहिला ट्वेन्टी-२० नॉर्थ सिडनी ओव्हल

९ ऑक्टोबर     दुसरा ट्वेन्टी-२०  नॉर्थ सिडनी ओव्हल

११ ऑक्टोबर    तिसरा ट्वेन्टी-२० नॉर्थ सिडनी ओव्हल