आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धामध्ये तीन पदकांची कमाई करीत भारताच्या जितू राय याने जागतिक नेमबाजी क्रमवारीतील एअर पिस्तूल विभागात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. लखनौ येथील २७ वर्षीय खेळाडू राय याने स्लोव्हेनियात झालेल्या स्पर्धेत एक सुवर्णपदक व एक रौप्यपदक जिंकले होते. एकाच जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. याआधी त्याने म्युनिक येथील स्पर्धेत रुपेरी कामगिरी केली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा तो सातवा भारतीय खेळाडू आहे. या पूर्वी अंजली भागवत, राजवर्धनसिंह राठोड, गगन नारंग, मानवजितसिंग संधू, रंजन सोधी व हीना सिद्धू यांनी ही कामगिरी केली होती.