कृत्रिम पायांनीशी सक्षम धावपटूंच्या शर्यतीत सहभागी होऊन सर्वाची मने जिंकणारा विख्यात धावपटू ऑस्कर पिस्टोरियस हा सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्य़ाअंतर्गत दोषी ठरला आहे. मैत्रीण रिव्हा स्टीनकॅम्पची हत्या केल्याच्या आरोपातून ऑस्करची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. पूर्वनियोजित कट रचून ऑस्करने हत्या केली हे सर्वार्थाने स्पष्ट होत नसल्याने हत्येच्या आरोपांतून त्याची सुटका करण्यात आल्याचे न्यायाधीश थोकझिले मसिपा यांनी सांगितले. मात्र सदोष मनुष्यवधाच्या आरोपांखाली ऑस्कर दोषी आढळल्याचे मसिपा यांनी शुक्रवारी जाहीर केले. सदोष मनुष्यवधासाठी ऑस्करला प्रचंड दंडाची शिक्षा किंवा १५ वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. ऑस्करच्या शिक्षेचे स्वरूप काय असेल, याबाबत न्यायालय काही दिवसांत निर्णय सुनावणार आहे.
या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या एका आरोपाअंतर्गत ऑस्कर दोषी असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या बंदूक चालवण्याप्रकरणी ऑस्कर दोषी आढळला. स्टीनकॅम्पच्या हत्येच्या काही दिवस आधी जोहान्सबर्ग येथील उपाहारगृहात मित्राची बंदूक हाताळताना ऑस्करच्या हातून गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. बंदुकीशी निगडित अन्य दोन आरोपांतून ऑस्करची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. स्टीनकॅम्पची हत्या झाली त्या घरात बेकायदेशीर शस्त्रसाठा केल्याच्या आरोपातून ऑस्करची सुटका करण्यात आली.