पोर्तुगालने बाद फेरीतील स्थान मिळवणे जवळपास अशक्य आहे, हे ख्रिस्तियानो रोनाल्डोने सामन्याआधीच म्हटले होते. स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी रोनाल्डोकडून जादुई कामगिरीची अपेक्षा होती. रोनाल्डोची जादू या सामन्यात दिसलीच नाही. त्याने एका गोलाची भर घालून पोर्तुगालच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पोर्तुगालने घानावर २-१ असा विजय साकारला. पण गोलफरकात पिछाडीवर पडल्यामुळे पोर्तुगालवर पहिल्याच फेरीतून बाहेर जाण्याची नामुष्की ओढवली. जर्मनीने अमेरिकेवर १-० असा विजय मिळवला. पण पोर्तुगालला तीन गोल्सनी मागे टाकून अमेरिकेने जर्मनीपाठोपाठ ‘ग’ गटात दुसरे स्थान काबीज केले.
सुरुवातीपासूनच पोर्तुगालने घानावर हल्ले चढवले. सहाव्या मिनिटालाच रोनाल्डोचा प्रयत्न घानाचा गोलरक्षक फातावू दौडाने रोखला. रोनाल्डोचे अनेक प्रयत्न घानाच्या बचावपटूंनी रोखल्यानंतर स्वत:च्याच चुकीमुळे घानावर पिछाडीवर पडण्याची वेळ आली. डाव्या कॉर्नरवरून मिळालेल्या क्रॉसवर चेंडू बाहेर ढकलण्याऐवजी घानाच्या जॉन बोयेने चेंडू आपल्याच गोलजाळ्यात ढकलला. या स्वयंगोलमुळे पोर्तुगालला आघाडी मिळाली. पण दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला घानाने सुरेख गोल करून बरोबरी साधली. घानाचा प्रमुख खेळाडू असामोह ग्यानने क्वाडवो असामोहच्या क्रॉसवर हेडरद्वारे गोल लगावला. वारंवार प्रयत्न करूनही रोनाल्डोला गोल करण्यात अपयश येत होते. अखेर ८०व्या मिनिटाला रोनाल्डो पोर्तुगालसाठी धावून आला. डावीकडून मिळालेल्या क्रॉसवर घानाच्या बचावपटूनेच पायाने चेंडू हवेत उडवला. हा चेंडू दौडाने बाहेर ढकलण्याऐवजी मैदानात उडवला. अखेर समोरच उभ्या असलेल्या रोनाल्डोने डाव्या पायाने जोरदार फटका लगावत पोर्तुगालसाठी दुसरा गोल केला. त्यानंतर पोर्तुगालची आघाडी आणखी मजबूत करण्याचे रोनाल्डोचे प्रयत्न फोल ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
विझण्याआधी ज्योत तेजाने जळली…
पोर्तुगालने बाद फेरीतील स्थान मिळवणे जवळपास अशक्य आहे, हे ख्रिस्तियानो रोनाल्डोने सामन्याआधीच म्हटले होते.
First published on: 27-06-2014 at 01:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portugal vs ghana ronaldo scores but portugal crash out