पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोस हे गोल झळकावण्यात अपयशी ठरणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पाठीशी आहेत. बुधवारी होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात रोनाल्डोच्या पराक्रम दाखवेल आणि पोर्तुगालचा संघ उपउपांत्यपूर्व फेरी गाठेल, अशी सांतोस यांना आशा आहे.

फ्रान्समध्ये युरो चषक स्पर्धा मध्यावर आली असताना रोनाल्डोसारखा फुटबॉल जगतामधील अव्वल दर्जाचा खेळाडू अद्याप आपले खाते उघडू शकलेला नाही. मागील चार सलग युरोपीयन चषक फुटबॉल स्पध्रेत रोनाल्डोने गोल साकारले आहेत. गोलचे अनेक विक्रम नावावर असणाऱ्या ३१ वर्षीय रोनाल्डोला यंदाच्या युरो स्पध्रेत २० वेळा गोल झळकावण्याची संधी चालून आली. पण ती त्याला यशस्वी करता आली नाही.

शनिवारी ऑस्ट्रियाविरुद्धचा गोलशून्य बरोबरीचा सामना हा रोनाल्डोच्या कारकीर्दीतील १२८वा आंतरराष्ट्रीय सामना होता. मात्र महत्त्वाची पेनल्टी दवडल्यामुळे त्याचा हा विक्रमी सामना झाकोळला गेला. आइसलँडविरुद्धच्या सामन्यातसुद्धा ७९व्या मिनिटाला रोनाल्डो गोल नोंदवण्यात अपयशी ठरला होता. ती लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे गोलसाठी झगडणारा रोनाल्डो असे चित्र या स्पध्रेत पाहायला मिळत आहे.

‘‘रोनाल्डोच्या नावावर अनेक महत्त्वाचे गोल जमा आहेत. हंगेरीविरुद्धच्या पुढील सामन्यात तो नक्की गोल साकारेल,’’ असा विश्वास सांतोस यांनी व्यक्त केला.