देशभरात करोना विषाणूमुळे सध्या गंभीर वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येक दिवशी महत्वाच्या शहरात करोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता, १५ एप्रिलनंतरही स्पर्धा सुरु होईल की नाही हे निश्चीत नाही. यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा खेळवायची की नाही यावर अनेक मतमतांतर आहेत. काही संघमालक आणि खेळाडूंनी प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवायची तयारी दाखवली आहे. तर काही खेळाडूंनी याला विरोध केला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास, बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आयपीएलसाठी नवीन वेळापत्रक आखता येईल का याची चाचपणी करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CNBC TV-18 वृत्तवाहिनीला बीसीसीआयच्या दोन अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर, क्रिकेट बोर्ड आयपीएलसाठी नवीन पर्यायांचा विचार करत असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये जुलै महिना किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला स्पर्धा खेळवता येईल का यावर विचार सुरु असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. “बीसीसीआय सामन्यांचं आयोजन करण्यासाठी पर्यायांचा विचार करतंय. जुलै महिना किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीस स्पर्धा खेळवता येईल का हे तपासलं जात आहे. सध्याच्या परिस्थिती सुरु असलेलं लॉकडाऊन जून महिन्यापर्यंत वाढलं तर मात्र ही स्पर्धा संपूर्ण वेळापत्रकानुसार खेळवणं कठीण जाईल.”

मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने १५ एप्रिलपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास, आयपीएलचा हंगाम छोटेखानी स्वरुपात खेळवाला लागेल असे संकेत दिले होते. यंदाचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे ३ हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्र सरकार लॉकडाउनबद्दल नेमकं काय निर्णय घेतं त्यावर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं भवितव्य ठरणार असल्याचं आता स्पष्ट होतंय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibly in july latest during winter who said what on likely ipl 2020 window psd
First published on: 10-04-2020 at 19:49 IST