आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा खेळाडूंना मूलमंत्र
कोणत्याही खेळात यशस्वी होणे सोपे नसते. यासाठी ‘३ डी’ म्हणजे शिस्त (डिसिप्लीन), समर्पण (डेडिकेशन) आणि दृढनिश्चय (डिटरमिनेशन) हा मंत्र आवश्यक आहे, असे मत माजी आंतरराष्ट्रीय बॅडिमटनपटू प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले. ते स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन व रायसोनी समूहाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा अचिवर्स पुरस्कार समारंभात बोलत होते. रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित समारंभात मुख्य अतिथी प्रकाश पदुकोन यांच्या हस्ते शहरातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात आले. पदुकोण पुढे म्हणाले, उत्कृष्ट खेळाडू बनण्यास अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. अभ्यासासह खेळामध्ये समन्वय कायम राखणे, अत्यंत कठीण काम असते. यासाठी खेळाडूंना ‘टाईम मॅनेजमेंट’मध्येही सजग असावे लागते. यावेळी रायसोनी समूहाचे चेअरमेन सुनील रायसोनी, बद्यनाथ ग्रुपचे जॉईंट सीएमडी सुरेश शर्मा व बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक आनंद कोठिवान उपस्थित होते. वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रीय बॅडिमटन ‘चॅम्पियन’ ठरलेले पदुकोण म्हणाले, आजचे युवा खेळाडू खूप ‘लकी’ आहेत. आज त्यांच्यासाठी अनेक संधी आहेत. त्याचा त्यांनी फायदा घ्यायला हवा. एकेवेळी फक्त क्रिकेटच दिसायचे मात्र, आता असे होत नाही. आज अनेक गोष्टी होत आहेत व हा क्रम सुरू राहायला हवा. खेळाडूंना जेवढय़ा जास्त संधी मिळतील ते तेवढे जास्त सुधारणा करू शकतील. क्रीडा आणि खेळाडूंसाठी शासनही गंभीर झाले आहे व अनेक फाऊंडेशनही पुढे येत आहेत. ही चांगली सुरुवात आहे. देशात अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत मात्र, ते पुढे येऊ शकत नाही, परंतु शासन आणि फाऊंडेशनच्या मदतीने ग्रामीण भागांमधूनही खेळाडूंची प्रतिभा पुढे येत आहे.
बीसीसीआयकडून ‘स्पोर्ट्स मार्केटिंग’ शिका
देशाला पहिला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावून देणारे पदुकोण यांनी युवा खेळाडूंसह क्रीडा संघटनांनाही मूलमंत्र दिला. एकेकाळी क्रिकेट अत्यंत सीमित होता. मात्र, आता सीमेबाहेरही व्यापक झाला आहे. याचे सारे श्रेय बीसीसीआयच्या स्पोर्ट्स मार्केटिंगला जाते. ऑलिम्पिकमध्ये आमच्या क्रीडा फेडरेशनला बीसीसीआयकडून स्पोर्ट्स मार्केटिंग शिकायला हवे. यामुळे क्रीडा, खेळाडू आणि संघटना या तिघांचाही फायदा होईल. बीसीसीआयला त्याचा कसा फायदा झाला, ते आपल्यापुढेच आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रकाश पदुकोण यांच्या हस्ते विविध खेळांशी संबंधित खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय महिला क्रिकेटपटू मोना मेश्रामला तर पुरुष गटात विदर्भ रणजी संघाचा वेगवान गोलंदाज ललित यादवला सिनियर उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय ज्युनियर मुलींमध्ये बॅडिमटनपटू मालविका बंसोड आणि मुलांमध्ये बुद्धिबळपटू रौनक साधवानीला पुरस्कृत करण्यात आले. याशिवाय शहरात विविध खेळांच्या आयोजनात मुख्य भूमिका निभावण्याबद्दल धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांना ज्येष्ठ क्रीडा संघटक पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे, सचिव संदीप दाभेकर, कोषाध्यक्ष सुहास नायसे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ क्रीडा पत्रकार राम ठाकूर यांनी केले.