मनिला : दुखापतींमुळे भारताच्या एचएस प्रणॉयसह त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मार्च महिन्यात झालेल्या स्वीस खुल्या स्पर्धेत प्रणॉयला दुखापत झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धामधील उत्तम कामगिरीमुळे प्रणॉयला आशियाई आणि थॉमस चषकासाठी भारतीय संघात थेट स्थान देण्यात आले होते. या स्पर्धामध्ये खेळणार असल्याचे प्रणॉयने म्हटले आहे.

निवड चाचणी बॅडिमटन स्पर्धेतील विजेतेपदासह त्रिसा आणि गोपीचंद जोडीने आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि थॉमस चषकासाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

लक्ष्य, सिंधूवर भिस्त

आशियाई अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ होत असून, भारताच्या आव्हानाची धुरा दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेन यांच्यावर अवलंबून आहे. प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या २० वर्षीय लक्ष्याची सातत्यपूर्ण कामगिरी उंचावते आहे. इंडिया खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाशिवाय जर्मन खुल्या स्पर्धेचे उपविजेतेपद त्याच्या खात्यावर आहे. लक्ष्यने २०२०मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१६ आणि २०१८मध्ये कनिष्ठ गटात अनुक्रमे कांस्य आणि सुवर्णपदकाची कमाई केली  होती. लक्ष्यची सलामीची लढत दोन वेळा कनिष्ठ विश्वविजेत्या चीनच्या लि शि फेंगशी आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल चौथ्या आशियाई पदकासाठी उत्सुक आहे. याशिवाय बी. साईप्रणित, आकर्षी कश्यप, सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला या खेळाडूंवर भारताच्या पदकांची भिस्त असेल.