भारताची पाच सुवर्णपदकांसह एकूण १२ पदकांची कमाई

विश्वचषक कॅरम स्पर्धा

मुंबई : दक्षिण कोरिया चूनचिऑन येथे झालेल्या पाचव्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारताच्या प्रशांत मोरेने पुरुष एकेरीत आणि एस. अपूर्वाने महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. भारताने या स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि २ कांस्य अशा एकूण १२ पदकांची कमाई केली.

पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत प्रशांतने सहकारी कर्णधार रियाझ अकबरअलीला तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-५, १९-२५, २५-१३ असे पराभूत केले. पहिला सेट प्रशांतने सहज जिंकून सुरुवात छान केली होती; परंतु दुसरा सेट रियाझने जिंकला व सामना बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रशांतने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि विजयश्री खेचून आणत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. रियाझला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये झहीरने श्रीलंकेच्या माजी विश्वविजेत्या निसांथा फर्नाडोला १७-१६, २५-० अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली व कांस्यपदकाची कमाई केली.

महिला एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात अपूर्वाने भारताच्याच काजल कुमारीचा २५-५, २५-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.  यापूर्वी २०१६ मध्ये लंडन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्येही प्रशांत व अपूर्वाने भारताला एकेरी गटात सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारताच्या आयेशा महम्मदने संघातील सहकारी कर्णधार रश्मी कुमारीला ५-२५, २५-१७, २५-१० असे तीन सेटमध्ये पराभूत करत कांस्यपदक पटकावले.

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या रियाझ अकबरअली आणि प्रशांत मोरे जोडीने भारताच्या झहीर पाशा व सगायभारती जोडीवर १०-२५, २५-४, २५-८ असा विजय मिळवला. त्यामुळे भारताने सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात कर्णधार रश्मी कुमारी आणि आयेशा महम्मद या भारताच्या जोडीने आपल्या संघातील सहकारी एस. अपूर्वा व काजल कुमारी जोडीवर २-२५, २५-७, २२-२० अशी मात केली. महिला सांघिक गटात भारतीय संघाने श्रीलंकेला ३-० असे सहज पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या विजयात रश्मी कुमारी, एस. अपूर्वा व काजल कुमारीचा महत्त्वाचा वाटा होता. पुरुष सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा वरचढ ठरला. २०१६ च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती करताना या वेळीही श्रीलंकेने भारतावर २-१ असा निसटता विजय मिळवला.