|| ऋषिकेश बामणे

माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक विमल कुमार यांचे मत

हैदराबाद : यंदाच्या प्रीमियर बॅडमिंटन लीगद्वारे (पीबीएल) भारताला अनेक उदयोन्मुख पुरुष खेळाडू गवसले, परंतु महिलांनी त्यांची कामगिरी उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत भारताचे माजी बॅडमिंटनपटू विमल कुमार यांनी व्यक्त केले.

रविवारी झालेल्या ‘पीबीएल’च्या पाचव्या पर्वातील अंतिम सामन्यात बेंगळूरु रॅप्टर्सने नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सला ४-२ अशी धूळ चारून सलग दुसऱ्या विजेतेपदावर नाव कोरले. या स्पर्धेचे विश्लेषण करताना ५७ वर्षीय विमल कुमार म्हणाले, ‘‘यंदाची ‘पीबीएल’ आजवरची सर्वोत्तम ठरली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विशेषत: भारताला या स्पर्धेद्वारे प्रियांशू राजवत, कृष्ण प्रसाद, ध्रुव कपिला, अरुण जॉर्ज यांसारखे काही प्रतिभावान एकेरी आणि दुहेरीतील पुरुष खेळाडू गवसले. त्याचप्रमाणे साईप्रणीतनेसुद्धा अनुभवाच्या बळावर बेंगळूरुच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे आगामी काही वर्षांत या स्पर्धेत भारतीय खेळाडूंमधील चुरस अधिक वाढलेली आपणास पाहायला मिळेल.’’

सध्याच्या महिला बॅडमिंटनविषयी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विमल कुमार म्हणाले की, ‘‘पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांच्यानंतर नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, विदेशातील खेळाडूंना कडवी झुंज देणाऱ्या महिला बॅडमिंटनपटू आपल्याकडे तयार झालेल्या नाहीत. त्यामुळे भारतासाठी ही एकप्रकारे धोक्याची घंटा आहे. गायत्री गोपिचंद, रितुपर्णा दास यांनी ताई झू यिंगविरुद्ध काहीशी चमक दाखवली. परंतु त्यांना तंदुरुस्ती आणि कौशल्यगुणांच्या तुलनेत अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे.’’

बॅडमिंटनचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांनी आपला आवडता संघ पराभूत झाला अथवा त्यांनी विजय मिळवला, तरी सामना संपताच स्टेडियम न सोडता पुरस्कार वितरणासाठी थांबूनही खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवावे, अशी अपेक्षा विमल यांनी व्यक्त केली.

श्रीकांतसाठी ऑलिम्पिकचा मार्ग खडतर!

भारताचा किदम्बी श्रीकांत टोक्यो ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे, अशी चिंताही विमल कुमार यांनी व्यक्त केली. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला आता अवघे पाच महिने शिल्लक असल्याने भारताचे कोणते खेळाडू या प्रतिष्ठित स्पर्धेस पात्र ठरतील, असे विचारले असता विमल म्हणाले, ‘‘पुरुष एकेरीत बी. साईप्रणीत, महिला एकेरीत सिंधू, सायना आणि पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी हे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करतील, असे मला वाटते. परंतु श्रीकांतच्या स्थानाविषयी मला साशंकता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीकांतचा सूर हरवला असून वर्षभरातील दुखापतींमुळे त्याची तंदुरुस्तीही काहीशी खालावलेली वाटते. त्यामुळे येणारा काळ त्याच्यासाठी अधिक खडतर असणार आहे.’’