मुळचा मुंबईकर आणि भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ मागचं दुखापतींचं ग्रहण काहीकेल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केल्यानंतर पृथ्वीची भारत अ संघात न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झाली होती. मात्र रणजी क्रिकेट स्पर्धेत कर्नाटकविरुद्ध सामन्यात पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं आहे.

मुंबईचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना, पृथ्वी शॉ मुंबईच्या खेळाडूने केलेला ओव्हरथ्रो वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली. यानंतर पृथ्वीला थेट मैदानाबाहेर नेण्यात आलं. १० जानेवारी रोजी भारत अ संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळे आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी पृथ्वी शॉ जवळ अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यानच्या काळात पृथ्वी दुखापतीमधून सावरला नाही, तर त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान रणजी स्पर्धेत पृथ्वीला आपली छाप पाडता आलेली नाहीये. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी पृथ्वीचा पर्यायी सलामीवीर म्हणून विचार करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये पृथ्वीच्या दुखापतीबद्दल काय नवीन माहिती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.