Prithvi Shaw-Sapna Gill Case: भारताचा युवा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ ने काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनची साथ सोडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला. या संघाकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावलं. मात्र यावेळी तो मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. काही महिन्यांपूर्वी पृथ्वी शॉ छेडछाड प्रकरणात अडकला होता. पृथ्वी शॉ ला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वारंवार संधी दिली गेली. असं असतानाही त्याने आपला जबाब नोंदवला नाही. आता सत्र न्यायालयाने त्याच्यावर कारवाई केली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.
सत्र न्यायालयाने पृथ्वी शॉ वर १०० रूपयांचा दंड आकारला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिलने त्याच्यावर धक्काबुक्की आणि छेडछाड करण्याचे आरोप केले होते. या प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉ ला अनेकदा आपली बाजू मांडण्याची संधी दिली. असं असतानाही त्याने आपला जबाब न नोंदवल्याने न्यायालयाने त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. १६ डिसेंबरला न्यायालयाची पुढची तारीख असणार आहे. या तारखेला हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जाईल याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
हे प्रकरण १५ फेब्रुवारी २०२३ ला अंधेरीतील एका पबमध्ये घडलं होतं. सपना गिलने असा दावा केला आहे की, पृथ्वी शॉ ने सेल्फीसाठी नकार दिला होता. त्यानंतर तिचा मित्र शोभित ठाकूरचा मोबाईल हिसकावून फेकून दिला. जेव्हा ती या प्रकरणात मध्ये पडली. त्यावेळी तिच्यावर हल्ला केला आणि तिची छेडछाड केली. हे प्रकरण घडल्यानंतर तिने पृथ्वी शॉ विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसात धाव घेतली. पण कुठलीही कारवाई न झाल्याने तिने दंडाधिकारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
या प्रकरणात सत्र न्यायालयाने कित्येकदा पृथ्वी शॉ ला आपला जबाब नोंदवायला सांगितलं. परंतू तो सतत टाळत राहिला. ९ सप्टेंबर २०२५ पर्यंत पृथ्वी शॉ ने आपला जबाब नोंदवलेला नाही. आता न्यायालयाने त्याला चेतावणी दिली आहे. त्याला जबाब नोंदवण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. मात्र, त्याला १०० रुपये दंड भरावा लागणार आहे.