Pro Kabaddi 2025: प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील १२ व्या हंगामाला दमदार सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत गुरूवारी (४ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पुणेरी पलटन आणि दबंग दिल्ली हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. पुणेरी पलटनने या स्पर्धेतील सुरूवातीचे ३ सामने जिंकले होते. त्यामुळे हा सामना जिंकून पलटनकडे विजयाचा चौकार मारण्याची संधी होती. पण अनुभवी सचिन तन्वरने शेवटच्या चढाईत केलेल्या एका चुकीमुळे पुणेरी पलटनच्या हातून सामना थोडक्यात निसटला.
या सामन्यात दोन्ही संघांनी दमदार सुरूवात केली. पुर्वार्धापर्यंत पुणेरी पलटनचा संघ ५ गुणांनी पिछाडीवर होता. पण उत्तरार्धात पुणेरी पलटनने दमदार पुनरागमन केलं. पलटनने बचावात आणि चढाईत दमदार कामगिरी केली. उत्तरार्धातील ७ व्या मिनिटाला पुणेरी पलटनने दबंग दिल्लीला पहिल्यांदा ऑलआऊट केलं आणि २२-२१ गुणांसह १ गुणाची आघाडी घेतली.
ही १ गुणाची आघाडी पुणेरी पलटनने शेवटच्या चढाईपर्यंत कायम ठेवली. सामन्यातील शेवटची चढाई सुरू असताना पुणेरी पलटनचा संघ २८-२७ गुणांसह १ गुणाने आघाडीवर होता. पलटनकडून शेवटची चढाई अनुभवी सचिन तन्वरने केली. सचिनला जाऊन फक्त टच लाईनला स्पर्श करून ३० सेंकद वाया घालवून परत आपल्या कोटमध्ये यायचं होतं. असं झालं असतं, तर पुणेरी पलटनचा संघ हा सामना १ गुणाने जिंकला असता. सचिनने चढाई करताना टच लाईनला स्पर्श केलं, पण त्याला माघारी परतण्यासाठी ३० सेंकदांहून अधिकचा वेळ घेतला. त्यामुळे सामना २८-२८ ने बरोबरीत सुटला.
सामना बरोबरीत सुटल्यानंतर नव्या नियमानुसार, सामन्याचा निकाल टाय ब्रेकरने लावला जातो. दोन्ही संघांना प्रत्येकी ५-५ रेड करण्याची संधी दिली जाते. या ५ रेडमध्ये जो संघ सर्वाधिक गुण मिळवतो तो संघ विजयी ठरतो. मात्र, यावेळी टाय ब्रेकरमध्येही सामना बरोबरीत राहिला. त्यामुळे पहिल्यांदाच गोल्डन रेड केली गेली. या गोल्डन रेडमध्ये दबंग दिल्लीकडून आशु मलिकने २ गुण घेतले आणि दबंग दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे पुणेरी पलटनची विजयाचा चौकार मारण्याची संधी हुकली.