मुंबईच्या NSCI मैदानात खेळवण्यात येणाऱ्या अखेरच्या दिवशी इंटर झोन चॅलेंज प्रकारात गतविजेत्या पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीची झुंज मोडून काढत सामन्यात बाजी मारली आहे. पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीवर ३८-३५ ने मात करत स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. पाटण्याकडून प्रदीप नरवालने १६ गुणांची कमाई केली. दिल्लीकडून नवीन कुमारने १५ गुण कमवले. दोन्ही सत्रांमध्ये हा सामना चांगलाच रंगतदार झाला. दबंग दिल्लीकडून चढाईत नवोदीत नवीन कुमार, चंद्रन रणजीतने चढाईचा मोर्चा सांभाळला. पाटण्याच्या बचावफळीला खिंडार पाडत महत्वाचे गुण कमावले. या दोन्ही खेळाडूंना दिल्लीच्या बचावफळीनेही चांगली साथ दिली. राजेश नरवालने ५ गुणांची कमाई केली, त्याला विशाल माने, जोगिंदर नरवालने प्रत्येकी ३-३ गुण मिळवत चांगली साथ दिली. पाटणा पायरेट्सच्या बचावफळीला आज आपली छाप पाडता आली नाही, मात्र चढाईपटूंनी आपली कामगिरी चोख बजावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.