घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पुणेरी पलटणने अखेरच्या काही सेकंदांमध्ये यू मुम्बाची कडवी झुंज मोडून काढत विजय मिळवला आहे. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात पुण्याने 33-32 अशी एका गुणाने बाजी मारली. शेवटच्या 30 सेकंदांमध्ये सामना 31-31 अशा बरोबरीत असताना, डू ऑर डाय रेडमध्ये यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने क्षुल्लक चूक करत पुण्याला 2 गुण बहाल केले. यानंतर गुरुनाथ मोरेला बाद करत मूम्बाने एक गुण कमावला खरा, मात्र तोपर्यंत पुण्याने सामन्यात बाजी मारली होती.
घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या पाठींब्यासह खेळणाऱ्या पुणेरी पलटणने पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व राखलं. नितीन तोमरने मॅरेथॉन चढाया करत यू मुम्बाला सर्वबाद केलं. त्याला बचावपटूंनीही उत्तम साथ दिली. या आक्रमक खेळाच्या जोरावर पुणेरी पलटणने पहिल्या सत्राच्या अखेरीस 17-12 अशी 5 गुणांची आघाडी घेतली.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 6 : यूपी योद्धा विरुद्ध बंगाल टायगर्स सामना बरोबरीत
दुसऱ्या सत्राच्या खेळात यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने सामन्याचं चित्र पालटलं. पुण्याच्या बचावफळीला खिंडार पाडत सिद्धार्थने या सामन्यातही चढाईमध्ये 10 गुणांची कमाई केली. दुसरीकडे पुण्याचा कर्णधार गिरीश एर्नाकने बचावात 5 गुणांची कमाई करत संघाचं पारडं वर राखण्याचे प्रयत्न केले. शेवटची 30 सेकंद शिल्लक असताना यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईवर डू ऑर डाय रेड करण्याची वेळ आली, यावेळी दबावामुळे सिद्धार्थचा पाय लॉबीत पडल्याने पंचांनी त्याला बाद ठरवत पुण्याला 2 गुण बहाल केले. यानंतर मूम्बाच्या खेळाडूंनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.