घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाटणा पायरेट्स संघाला यू मुम्बाने धक्का दिला आहे. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या सामन्यात यू मुम्बाने यजमान पाटणा पायरेट्सची झुंज 40-39 ने मोडून काढली. आजच्या सामन्यात पिछाडीवर असूनही यू मुम्बाने शेवटपर्यंत झुंज देत पाटण्याच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. अवश्य वाचा - Pro Kabaddi Season 6 : बंगाल वॉरियर्सकडून जयपूर पिंक पँथर्सचा धुव्वा पाटणा पायरेट्सच्या खेळाडूंनी आज अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. कर्णधार प्रदीप नरवाल आजच्या सामन्यात भलत्याच फॉर्मात होता. प्रदीपने सामन्यात चढाईममध्ये 17 गुणांची कमाई केली. पहिल्या सत्रात यू मुम्बाच्या संघाला सर्वबाद करण्यामध्ये प्रदीप नरवालने मोठा वाटा उचलला. मात्र दुसऱ्या बाजून यू मुम्बाच्या सिद्धार्थ देसाईने तोडीस तोड खेळ करत पाटण्याला टक्कर दिली. सिद्धार्थ आणि रोहित बालियान यांच्या चढायांमुळे यू मुम्बाने पहिल्या सत्रात सर्वबाद होऊनही 14-14 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पाटणा पायरेट्सने सामन्यात पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. पाटण्याच्या बचावपटूंनीही आपल्या कर्णधाराला उत्तम साथ देत काही चांगले गुण कमावले. मात्र सिद्धार्थ देसाईने अखेरपर्यंत गुण घेण्याचा सपाटा सुरुच ठेवला. बचावफळीत कर्णधार फजल अत्राचलीनेही पाटण्याच्या खेळाडूंच्या काही सुंदर पकडी करुन आपल्या संघाचं आव्हान सामन्यात कायम राखलं. अखेरच्या सेकंदापर्यंत यू मु्म्बाने बाजी पलटवून सामन्यात 40-39 अशी बाजी मारली. सिद्धार्थ देसाईने सामन्यात 15 गुणांची कमाई केली.