प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात ‘ब’ गटात आपला दबदबा कायम राखत बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजच्या संघावर पुन्हा मात केली. ३४-३० अशा फरकाने सामन्यात विजय मिळवत बंगालने ‘ब’ गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. चढाईपटू आणि बचावफळीतील खेळाडूंनी केलेली अष्टपैलू कामगिरी हे बंगालच्या आजच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्ले-ऑफच्या शर्यतीत बंगाल आधीच दाखल झाला असल्याने या सामन्याला केवळ औपचारिकता म्हणूनच महत्व प्राप्त झालं होतं. मात्र तरीही बंगालने आपल्या विजयाचा धडाका कायम ठेवला. चढाईत मणिंदर सिंहने बंगालकडून सर्वाधीक १२ गुणांची कमाई केली. त्याला दिपक नरवालने ३ तर बदली खेळाडू भूपिंदर सिंहने ४ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. या तिनही खेळाडूंना बाद करण्यात तामिळ थलायवाजच्या बचावपटूंना यश आलं नाही.

बंगालच्या बचावफळीत कर्णधार सुरजित सिंहने ६ गुणांची कमाई करत आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं. त्याला श्रीकांत तेवतियाने ३ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. अखेरच्या सत्रात तामिळ थलायवाजच्या चढाईपटूंनी केलेला प्रतिकार मोडून काढण्यात बंगालच्या बचावपटूंचाही महत्वाचा वाटा होता. तामिळ थलायवाजच्या बचावपटूंनी आज पुन्हा निराश केलं. अमित हुडा आणि दर्शन यांनी सामन्यात बचावात ५ गुणांची कमाई केली. मात्र बंगालच्या चढाईपटूंवर अंकुश लावण्यात त्यांनी केलेला खेळ तोकडात पडत होता. ज्यामुळे चढाईत गुण मिळवण्याचा भार कर्णधार अजय ठाकूर आणि प्रपंजनच्या जोडीवर आला.

अजय ठाकूरनेही आपल्या जबाबदारीचं भान राखत सामन्यात चढाईत १४ गुणांची कमाई केली. त्याला प्रपंजनने १० गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. या दोन्ही खेळाडूंनी अखेरच्या सत्रात चढायांचा धडाका लावत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने या दोघांचे प्रयत्न अपुरेच पडले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 5 bengal warriors beat tamil thalaivaj and once again their top position in group b
First published on: 13-10-2017 at 22:38 IST