अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात दबंग दिल्लीने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सचा अवघ्या एका गुणाने पराभव करत खळबळ उडवून दिली आहे. ३५-३४ अशा फरकाने जयपूरवर मात करत दबंग दिल्लीने मोठ्या कालावधीनंतर आपला पहिला विजय संपादीत केला. यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स या संघासाठी उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रत्येक सामना जिंकण गरजेचं बनलं आहे. मात्र या पराभवामुळे आता उपांत्य फेरीत कोण जाणार याची चुरस आणखीनच वाढली आहे.
सामन्याच्या सुरुवातीच्या मिनीटापासून जयपूरने दिल्लीवर आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. दिल्ली आणि जयपूर यांच्यात दुसऱ्या सत्रापर्यंत ३-४ गुणांचं अंतर होतं. मनजीत छिल्लरच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या जयपूरच्या संघाने आज आपल्या तरुण खेळाडूंना संधी दिली. त्याचा पुरेपूर फायदा उचलत नितीन रावलने सामन्यात चढाईमध्ये १४ गुणांची कमाई केली. त्याला पवन कुमारने ५ तर तुषार पाटीलने ४ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मनजीतच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषविणाऱ्या जसवीरला मात्र या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही.
ज्या तडफेने जयपूरच्या चढाईपटूंनी खेळ केला तो खेळ बचावपटूंना दाखवता आला नाही. सोमवीर शेखर आणि मनोज धुल यांनी सामन्यात मिळून अवघ्या ४ गुणांची कमाई केली. जयपूरच्या दुबळ्या बचावामुळेच दिल्लीने अखेरच्या क्षणापर्यंत सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं होतं. अखेरच्या चढाईत ३४-३४ अशी बरोबरी झाली असताना दिल्लीच्या विराज लांडगे आणि निलेश शिंदे या मराठमोळ्या जोडगोळीने जयपूरच्या पवन कुमारची पकड करत सामना दिल्लीच्या बाजूने फिरवला.
मोठ्या कालावधीनंतर दबंग दिल्लीच्या खेळाडूंनी आज आश्वासक खेळ केला. चढाईत कर्णधार मिराज शेख आणि अबुफजल मग्शदुलू यांनी ११ गुणांची कमाई करत आपल्या संघाचं आव्हान कायम राखलं. त्याला आर. श्रीराम आणि आनंद पाटील या खेळाडूंनी तितकीच चांगली साथ दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या बचावपटूंनी जयपूरच्या चढाईपटूंची पकड करत सामन्यात बरोबरी साधली. विराज लांडगे, तुषार भोईर, निलेश शिंदे आणि यथार्थ यांनीही आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला.