तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा मिलाफ असलेल्या दबंग दिल्लीच्या संघाने आज बंगळुरु बु्ल्सवर मात केली. ३८-३० अशा फरकाने बंगळुरुला पराभवाचा धक्का देत दिल्लीने आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली. दिल्लीच्या विजयात आज मोलाचा वाटा उचलला तो कर्णधार मिराज शेख आणि अबुफजल मग्शदुलू या जोडीने. दिल्लीच्या चढाईपटूंची कामगिरी इतकी धडाकेबाज होती की बचावपटूंना फार काही करण्याची गरजच भासली नाही. तरीही ज्या ठिकाणी गरज पडेल तिकडे दिल्लीच्या बचावपटूंनी आपला प्रभाव दाखवला.
मिराज शेखने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर १४ गुणांची कमाई केली. त्याचा इराणी साथीदार अबुफजल मग्शदुलूने ८ गुणांची चांगली साथ दिली. या दोन्ही इराणी खेळाडूंच्या चाली आणि डावपेचांना बंगळुरुचे बचावपटू उत्तर देऊ शकले नाही. या दोघांव्यतिरीक्त रोहीत बलियान आणि संधी मिळालेल्या बदली खेळाडूंनीही आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली.
बंगळुरुला रविंदर पेहेलची अनुपस्थिती चांगलीच जाणवली. रविंदरच्या गैरहजेरीत बंगळुरुचा बचाव दुबळा दिसत होता. बदली खेळाडू सुनील जयपालने आपल्या अष्टपैलू खेळाने ६ गुणांची कमाई केली खरी, मात्र दिल्लीच्या खेळापुढे त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. याव्यतिरीक्त एकाही बचावपटूने दिल्लीच्या आक्रमणासमोर लढण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे दिल्लीचं पारडं सामन्यात नेहमी वरचढ राहिलेलं पहायला मिळालं.
कर्णधार रोहीत कुमारने १३ गुणांची कमाई करत आपल्या संघाचं आव्हान सामन्यात कायम राखण्याचा प्रयत्न केला. त्याला अजय कुमारने ५ गुण कमावत चांगली साथ दिली. मात्र बचावपटूंच्या कमकुवत खेळामुळे त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले.