आपल्या घरच्या मैदानावर खेळताना हरियाणा स्टिलर्सने बंगळुरु बुल्सचं आव्हान ३८-३१ असं परतवून लावलं. गेल्या काही सामन्यांमध्ये बंगळुरु बुल्सची कामगिरी काही चांगली होत नाहीये. त्यात रविंदर पेहलवर झालेल्या कारवाईमुळे बंगळुरुची बचावफळी चांगलीच कमकुवत झालेली आहे, ज्याचा परिणाम बंगळुरुच्या खेळावर होताना दिसतो आहे.
हरियाणाकडून आजच्या सामन्यात प्रशांत कुमार राय आणि दिपक दहीया यांनी आश्वासक खेळ केला. प्रशांतने सामन्यात चढाईत १६ गुणांची कमाई केली. त्याला दिपक दाहियाने ८ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. या सामन्यात हरियाणा स्टिलर्सच्या बचावफळीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आले नाही. कर्णधार सुरिंदर नाडा, मोहीत छिल्लर यांनी बचावात काही गुणांची कमाई केली, मात्र संघाच्या विजयात प्रशांत आणि दिपक या खेळाडूंनीच आपली महत्वाची भूमिका बजावली.
बंगळुरु बुल्सच्या बचावफळीने केलेला निराशाजनक खेळ हा त्यांच्या पराभवाचं कारण ठरला आहे. रविंदर पेहेलची संघातली अनुपस्थिती बंगळुरुला चांगलीच महागात पडतेय. रविंदरच्या अनुपस्थित बंगळुरुची बचावफळी ही तकलादू वाटत होती. एकाही खेळाडूला आजच्या सामन्यात आश्वासक खेळ करता आला नाही, ज्याचा फायदा हरियाणाच्या खेळाडूंनी घेतला.
अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – काशिलींग-श्रीकांत जाधवचा झंजावात, गतविजेते पाटणा पायरेट्स पराभूत
चढाईत बंगळुरुकडून अजय कुमारने १३ गुणांची कमाई केली, त्याला अष्टपैलू सुनील जयपालने ९ तर कर्णधार रोहीत कुमारने ५ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.