scorecardresearch

Pro Kabaddi Season 5 – तामिळ थलायवाजची झुंज मोडून यू मुम्बा विजयी, अनुप कुमार चमकला

काशिलींग अडकेची चढाई निर्णायक

तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरची पकड करताना यू मुम्बाचे बचावपटू
तामिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरची पकड करताना यू मुम्बाचे बचावपटू

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या तामिळ थलायवाजची झुंज मोडून काढत यू मुम्बाने सामन्यात विजय संपादन केला. शेवटच्या काही मिनीटांमध्ये काशिलींग अडकेने चढाईत मिळवलेल्या २ गुणांच्या जोरावर यू मुम्बाने तामिळ थलायवाजला ३३-३० अशा फरकाने हरवत आपली विजयी परंपरा कायम सुरु ठेवली आहे. यू मुम्बाचा पुढचा सामना हरियाणा स्टिलर्सविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – अटीतटीच्या लढतीत बंगालचा विजय, जयपूर पराभूत

सामन्याच्या सुरुवातीपासून यू मुम्बाने आक्रमक खेळ करत भक्कम आघाडी घेतली होती. चढाईत श्रीकांत जाधव आणि अनुप कुमारने मुम्बाला आघाडीवर आणण्यात मोलाची कामगिरी बजावली. गेले काही सामने केवळ आपल्या खेळाडूंना आधार देण्याचं काम करणारा अनुप कुमार आजच्या सामन्यात चमकला. अनुपने चढाईत ८ गुणांची कमाई केली. या आक्रमक खेळाच्या जोरावर मुम्बाने तामिळ थलायवाजला ऑलआऊट केलं. मात्र त्यानंतर कमबॅक करत तामिळने मुम्बाला ऑलआऊट करत सामन्यात पुनरागमन केलं.

पहिल्या सत्राच्या अखेरपर्यंत मुम्बाकडे नाममात्र गुणांची आघाडी होती खरी, मात्र दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत तामिळने मुम्बाला धक्का दिला. मात्र काशिलींग, शब्बीर, अनुप आणि श्रीकांत जाधव यांनी सामन्य़ावरील आपली पकड ढिली होऊ दिली नाही. चढाईपटूंप्रमाणेच बचावफळीनेही तोडीस तोड कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. बचावफळीत कुलदीपने सर्वाधीक ५ बळी मिळवले, त्याला सुरिंदर सिंहने ३ आणि जोगिंदर नरवालने १ गुण मिळवत चांगली साथ दिली.

तामिळ थलायवाजने आजच्या सामन्यात यू मुम्बाला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या क्षणांमध्ये आपल्या खेळावर नियंत्रण न ठेवता आल्याने तामिळ थलायवाजने हा सामना गमावला. कर्णधार अजय ठाकूरने सामन्यात चढाईत १० गुणांची कमाई केली. त्याला प्रपंजनने ८ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. दुसऱ्या सत्रात प्रपंजनने तिसऱ्या चढाईवर केलेला खेळही नक्कीच कौतुकास्पद होता. मात्र बचावफळीने अखेरच्या क्षणी केलेल्या हाराकिरीमुळे तामिळ थलायवाज मोक्याच्या क्षणी बॅकफूटला ढकलला गेला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-10-2017 at 22:39 IST

संबंधित बातम्या