कर्णधार अनुप कुमारचा खेळ आणि त्याला काशिलींग अडके आणि श्रीकांत जाधव या मराठमोळ्या शिलेदारांनी दिलेली साथ या जोरावर यू मुम्बाने बंगाल वॉरियर्सवर मात केली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बंगाल वॉरियर्सला ३७-३१ अशा फरकाने पराभूत करुन मुम्बाने आपल्या सहाव्या विजयाची नोंद केली आहे. या विजयासह यू मुम्बा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

या सामन्यातील पहिल्या सत्रात काशिलींग अडके आणि श्रीकांत जाधव या मुम्बाच्या चढाईपटूंना बंगालचा बचाव खिळखिळा करुन टाकला. रण सिंह, श्रीकांत तेवतिया सारख्या बचावपटूंना या दोन्ही खेळाडूंनी आपलं लक्ष्य बनवलं. विशेष करुन श्रीकांत जाधवने बंगालचा कर्णधार सुरजित सिंहला लक्ष्य करुन काही चांगले गुण मिळवले. गेल्या काही सामन्यांमध्ये अनुप कुमार श्रीकांत जाधववर विश्वास ठेवताना दिसतोय. श्रीकांत जाधवही आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलून आश्वासक खेळ करतोय.

काशिलींगनेही आज आपल्या नेहमीच्या फॉर्मात येत चढाई आणि बचावात मिळून ८ गुणांची कमाई केली. कर्णधार अनुप कुमार हा पहिल्या सत्रात सावध खेळ करताना दिसला. मात्र दुसऱ्या सत्रात यू मुम्बाच्या संघावर जेव्हा ऑलआऊट होण्याची वेळ आली, तेव्हा अनुपनेच जवळपास ३ वेळा संघाला ऑलआऊट होण्यापासून वाचवलं. दर्शन कादियाननेही २ गुणांची कमाई करत आपल्या इतर खेळाडूंना चांगली साथ दिली. मुम्बाच्या चढाईपटूंना खेळ इतका उत्कृष्ट होता की बचावपटूंना फार काही कष्ट घ्यावे लागले नाहीत. तरीही सुरिंदर सिंह आणि कुलदीप सिंह या बचावपटूंनी ४ गुणांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा हातभार उचलला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बचावपटूंची निराशाजनक कामगिरी आणि चढाईत एकट्या मणिंदर सिंहने दिलेली झुंज ही बंगालच्या पराभवाची महत्वाची कारणं ठरली. मणिंदरने आजच्या सामन्यात चढाईत १२ गुणांची कमाई केली. मात्र त्याला जँग कून ली, विनोद कुमार यांच्याकडून हवीतशी साथ मिळाली नाही. बदली खेळाडू भुपिंदर सिंहने काहीकाळ चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र मुम्बाच्या संघापुढे त्याचा निभाव लागला नाही.

बचावफळीतही बंगालच्या संघाला विशेष कामगिरी बजावता आलेली नाही. कर्णधार सुरजित सिंह आणि रण सिंह यांना आजच्या सामन्यात केवळ ३ गुण मिळवता आले. याव्यतिरीक्त एकाही बचावपटूला आज त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर बंगाल वॉरियर्सला पराभवाचा सामना करावा लागला.