शाह आलम (मलेशिया) : भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुखापतीमुळे घ्याव्या लागलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर विजयी पुनरागमन केले. सिंधूच्या कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने बुधवारी आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत बलाढ्य चीनचे आव्हान ३-२ असे परतवून लावले.
भारतीय महिला संघाचा समावेश असलेल्या ‘डब्लू’ गटात केवळ दोनच संघ आहेत. त्यामुळे पहिली लढत खेळण्यापूर्वीच भारतीय संघाने बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र, साखळीतील एकमेव लढत खेळताना भारतीय संघाने चीनचे अवघड आव्हान परतवून लागले.
हेही वाचा >>> “मी म्हटलं, प्लीज पैसे घे, पण धोनीने नकार दिला”, BAS च्या मालकांनी सांगितला माहीचा मनं जिंकणारा किस्सा
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सिंधू बॅडमिंटन कोर्टपासून दूर होती. दरम्यानच्या काळात आवश्यक तेवढाच सराव करून सिंधूने पुनरागमनासाठी आशियाई स्पर्धेची निवड केली. या स्पर्धेसाठीच्या भारतीय महिला संघात सिंधू ही सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. सिंधूने या जबाबदारीचे भान ठेवत पहिल्या लढतीत तुल्यबळ प्रतिस्पर्धी हॅन युएचे आव्हान २१-१७, २१-१५ असे ४० मिनिटांत परतवून लावले. त्यानंतर तनिशा क्रॅस्ट्रो आणि अश्विनी पोनप्पा जोडीला दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना चीनच्या तियू शेंग शू आणि तान निंग जोडीने १९-२१, १६-२१ असे पराभूत केले. पाठोपाठ एकेरीच्या दुसऱ्या लढतीत अश्मिता चलिहालाही पराभव पत्करावा लागला. अश्मिता वँग झी यी हिचाविरुद्ध १३-२१, १५-२१ अशी पराभूत झाली.
दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीने विजय मिळवत भारताला एकूण लढतीत बरोबरी साधून दिली. त्यांनी चीनच्या ली यी आणि लुओ शू मिन जोडीला १०-२१, २१-१८, २१-१७ असे नमवले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या अनमोल खरबने चीनच्या दुसऱ्या फळीतील वु लु यू हिचा २२-२०, १४-२१, २१-१८ असा पराभव करत भारताला विजय मिळवून दिला. भारतीय पुरुष संघानेही आपल्या मोहिमेची यशस्वी सुरुवात करताना हाँगकाँगवर ४-१ असा सहज विजय मिळवला. प्रमुख खेळाडू एच. एस. प्रणॉयला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतरच्या सर्व लढती भारताने जिंकल्या.