या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या भीतीमुळे म्युनिच येथील स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर आता नवी दिल्लीत होणारी आगामी नेमबाजी विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यासाठी भारतीय रायफल असोसिएशनवर (एनआरएआय) प्रचंड दबाव आणला जात आहे.

नवी दिल्लीतील नेमबाजी विश्वचषक स्पर्धा १५ ते २६ मार्चदरम्यान होणार होती, मात्र स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवस आधीच ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर ही स्पर्धा दोन टप्प्यांत घेण्याची घोषणा करण्यात आली. रायफल आणि पिस्तूल प्रकाराची विश्वचषक स्पर्धा ५ ते १२ मेदरम्यान तर शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जूनदरम्यान आयोजित केली जाणार आहे.

म्युनिच येथील स्पर्धा रद्द केल्यानंतर आता भारतीय रायफल असोसिएशनने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवावे, असा दबाव त्यांच्यावर येत आहे. त्याचबरोबर जगभरात करोनाचा धोका वाढत चालला असून या स्पर्धेबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे. ‘‘नवी दिल्लीनंतर म्युनिच येथे स्पर्धा होणार होती, पण म्युनिचमधील स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर आमच्यावरही स्पर्धा रद्द करण्यासाठी दबाव येत आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातही टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी सराव कसा करायचा, हा प्रश्न सर्वानाच सतावत आहे. भारतातील अनेक राज्य संघटनांकडूनही स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनेक सूचना आल्या आहेत. त्यामुळे आम्ही या स्पर्धेच्या आयोजनाविषयीचा निर्णय नंतर घेणार आहोत,’’ असे ‘एनआरएआय’च्या सूत्रांनी सांगितले.

तीन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारा तसेच पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणारा नेमबाज राजमंड डेबेव्हेक यानेही ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. ‘‘संपूर्ण भारतात सध्या टाळेबंदी असताना आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ नवी दिल्लीत ५ ते १३ मेदरम्यान होणाऱ्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्याचा विचार करत आहे,’’ असे देबेव्हेकने समाजमाध्यमांवर टाकले आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाच एका वर्षांने पुढे ढकलण्यात आल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याविषयाची सूचना योग्य आहे. टाळेबंदीमुळे सर्व कार्यालये बंद असताना या स्पर्धेसाठी खेळाडूंना नव्याने व्हिसा मिळवणे तसेच आपल्या शस्त्रसाठय़ासाठी विविध परवनाग्या मिळवणे जिकिरीचे बनले आहे

– ‘एनआरएआय’चे पदाधिकारी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question mark about world cup shooting abn
First published on: 03-04-2020 at 00:28 IST