विजेतेपदात वॉवरिंकाचाच अडथळा
दुखापतीमुळे तो टेनिस कोर्टपासून बराच काळ दुरावला होता.. पुनरागमनानंतरही त्याला नवख्या खेळाडूंकडून अनेकदा पराभव पत्करावा लागला.. त्यामुळे त्याचा खेळ संपुष्टात आल्याच्या चर्चाही रंगल्या.. पण स्वप्नपूर्तीसाठी झपाटलेल्या या खेळाडूने सर्वाना चुकीचे सिद्ध करताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. लाल मातीचा सम्राट राफेल नदाल असे त्या जिद्दी खेळाडूचे नाव.. रविवारी नदाल आणि फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या दहाव्या जेतेपदाच्या मार्गात स्वित्र्झलडच्या स्टॅन वॉवरिंकाचा अडथळा असणार आहे. नदालला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपदांची दशकपूर्ती करण्याची येथे संधी आहे. मात्र त्यासाठी त्याला तृतीय मानांकित वॉविरकाचा अडथळा दूर करावा लागणार आहे.
नदालने यंदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविताना झंझावाती खेळाचा प्रत्यय घडविला़. त्याने केवळ २९ गेम्स गमावले आहेत. उपांत्य फेरीत त्याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमचा सरळ तीन गेम्समध्ये धुव्वा उडवला होता. वॉवरिंकाने उपांत्य फेरीत अग्रमानांकित अँडी मरेला पाच सेट्सच्या लढतीनंतर हरविले होते. त्यामुळेच नदालला वॉवरिंकाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल अशी अपेक्षा आहे.
अंतिम फेरीत नदालचीच हुकमत
क्लेकोर्ट व नदाल यांचे समीकरण आहे. त्यामुळेच जेव्हा त्याच्याविरुद्ध येथे अंतिम फेरीचा सामना खेळला जातो, तेव्हा त्याचीच हुकमत असते. त्याच्याविरुद्धचा प्रतिस्पर्धी त्याच्याइतका तुल्यबळ असला तरीही विजेतेपदाचे पारडे त्याच्या बाजूने झुकलेले असते असे सांगून वॉवरिंका म्हणाला, त्याच्याविरुद्ध अंतिम सामना गमावला तर त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र त्याच्याविरुद्ध विजय मिळविला ते जगातील आश्चर्यच समजले जाते. मी हे आश्चर्य घडविणार आहे. मरे याच्यावर मात केल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला आहे.
निर्णायक लढतीत खरी कसोटी
वॉवरिंका हा जिगरबाज खेळाडू आहे. मरे याच्यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूला येथे त्याने हरविले आहे. क्लेकोर्टवर आपणही चांगला खेळ करू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी माझी कसोटी ठरणार आहे, असे नदाल याने सांगितले. तो म्हणाला, परतीचे घणाघाती फटके मारण्याबाबत त्याची हुकमत आहे. त्याचे हे फटके रोखणे खूप अवघड असते. त्याच्यावर मात करण्यासाठी मला वेगळीच रणनीती उपयोगात आणावी लागणार आहे. त्याला नैसर्गिक फटकेबाजीपासून रोखणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे असेल.