कनिष्ठ (१९ वर्षांखालील)गटात विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक व अन्य सर्व सपोर्ट स्टाफला समान पारितोषिक देण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्य केले आहे. आपल्याला अन्य स्टाफपेक्षा जास्त रक्कम देऊ नये, अशी मागणी करीत या संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपले पारितोषिक घेण्यास नकार दिला होता.
पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडमध्ये विश्वकरंडक जिंकल्यानंतर मंडळाने द्रविड यांना पन्नास लाख रुपये,तर अन्य सपोर्ट स्टाफ व खेळाडूंना अनुक्रमे ३० लाख व २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. सपोर्ट स्टाफमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा व गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांचा समावेश आहे. संघाने मिळविलेल्या विजेतेपदाचे श्रेय केवळ माझ्या एकटय़ाचे नसून सर्व खेळाडू व सपोर्ट स्टाफचे आहे त्यामुळे अन्य सपोर्ट स्टाफलाही समान रक्कम देणे आवश्यक असल्याचे द्रविड यांनी मत व्यक्त केले होते.
द्रविड यांची मागणी मान्य करीत मंडळाने संघातील प्रत्येक प्रशिक्षकास २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.