विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीत पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकपदासाठी शोध सुरु केला. सर्व प्रक्रियेनंतर माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्रींच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडली. पण २०१७ मध्ये राहुल द्रविड हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मुख्य दावेदार असल्याचं, तत्कालीन क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितलं. ते Sportskeeda ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“त्यावेळी राहुलचं नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होतं. आमचं त्याच्याशी बोलणंही झालं होतं. पण त्यावेळी राहुलने आपल्याला परिवाराला वेळ द्यायचा आहे हे कारण सांगत ही ऑफर नाकारली”, विनोद राय यांनी मुलाखतीमध्ये खुलासा केला. राहुल म्हणाला, माझ्या घरात दोन मुलं आहेत. सध्या मला त्यांच्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत राहणं गरजेचं वाटतंय. गेली अनेक वर्ष मी संघासोबत जगभर फिरत होतो, त्यावेळी मला परिवाराला वेळ देणं जमलं नाही. राहुलचं म्हणणं पटल्यानंतर बीसीसीआयने मुलाखती घेण्याचं ठरवल्याचं राय यांनी सांगितलं.

विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी आणि रवी शास्त्री या तिघांमध्ये झालेल्या शर्यतीत दोन वर्ष टीम इंडियाचे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या शास्त्रींच्या गळ्याच प्रशिक्षकपदाची माळ पडली. सुरुवातीला रवी शास्त्री देखील या पदासाठी उत्सुक नव्हते. परंतू विराटने केलेल्या विनंतीनंतर, बीसीसीआयचे अर्जासाठीची तारीख वाढवली आणि शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, शास्त्रींचा करार संपला होता. यानंतर बीसीसीआयने २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत शास्त्रींना करारात मुदतवाढ दिली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul dravid was top contender for team indias head coach post but he chose family reveals vinod rai psd
First published on: 06-07-2020 at 15:20 IST