नऊ वेळा विजेतेपद पटकावणारा सुरेश राणा तिसरा
वळणावळणांच्या टप्प्यांत पार पडणाऱ्या मोटर शर्यतीपेक्षा वेगळ्या आणि खडतर आव्हानांनी सज्ज असलेल्या ‘मारुती-सुझुकी रेड दी हिमालया’ शर्यतीत राज सिंग राठोड आणि अरविंद के.पी. यांनी जेतेपदाचा मान पटकावला. सहा दिवसांतील २००० किलोमीटरच्या आव्हानात्मक शर्यतीत राठोडने पोलारीस गाडीसह चारचाकी गटात, तर अरविंदने टीव्हीएस आरटीआर ४५०सह दुचाकी गटात अव्वल स्थान पटकावले.
चारचाकी विभागात सहापैकी पाच टप्प्यांमध्ये आघाडीवर असलेला आणि नऊ वेळा स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या सुरेश राणाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पाचव्या दिवसाच्या रंगदूम ते पदम आणि थांग ते रंगदूम या १८० किलोमीटरच्या शरीर गोठवणाऱ्या टप्प्यात राणाच्या गाडीचा अपघात झाला आणि तो पिछाडीवर गेला. मोटर शर्यतीत नेहमी पाहायला मिळणाऱ्या थरारापेक्षा अधिक चित्तथरारक आणि शर्यतपटूंच्या शारीरिक व मानसिक कसोटीचा कस पाहणाऱ्या या शर्यतीत १६७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ ६८ जणांनाच स्पध्रेतील सर्व टप्पे पार करण्यात यश आले.
चारचाकी आणि दुचाकी वाहनपटूंची आवड जोपासणाऱ्या आणि त्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या शर्यतपटूंसाठी ही स्पर्धा म्हणजे सुवर्णसंधीच. शिमलाच्या डोंगराळ भागातून सुरू झालेली ही स्पर्धा श्रीनगर येथे संपली. राठोडने सहचालक अंबेर उदासीसह १० तास ४० मिनिटे व ५६ सेकंदात सहा टप्पे पूर्ण केले. त्सेरिंग लहाक्पा व सहचालक वेणू रमेश कुमार यांनी १० तास ५६ मिनिटे व ५८ सेकंदात दुसरे, तर सुरेश राणा व सहचालक परमिंदर ठाकूर यांनी ११ तास ७ मिनिटे व ५० सेकंदात तिसरे स्थान पटकावले. दुचाकी गटात अरविंद, नटराज आर. आणि आशीष सौरभ एम. यांच्यात सहाही टप्प्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. यामध्ये ९ तास, ३९ मिनिटे व २२ सेकंदाची वेळ नोंदवून अरविंदने अव्वल स्थान पटकावले. नटराज (०९:५७:२९ सेकंद) आणि आशीष (१०:२०:१८ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभर हा चषक उंचावण्याची मी प्रतीक्षा पाहत होतो आणि अखेर ती संपली. स्वप्न सत्यात उतरल्याचा आंनद होत आहे. आशा करतो की पुढील वर्षीही जेतेपद पटकावण्यात यश मिळेल. कारण, प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक होत चालली आहे.
राज सिंग राठोड

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj singh rathore clinches top prize at raid de himalaya
First published on: 21-10-2015 at 02:50 IST