Controversy over Travis Head’s stumping : आयपीएल २०२४ च्या ५० व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले. सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघासाठी ट्रॅव्हिस हेडने शानदार अर्धशतक झळकावले. त्याला नेहमीप्रमाणे त्याच्या स्फोटक शैलीत फलंदाजी करता आली नाही, तरीही त्याने ४४ चेंडूत ५८ धावा केल्या. यादरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. या दरम्यान तो बाद क्लीन बोल्ड होण्याच्या अगोदर रनआऊट झाला होता, पंरतु त्याला थर्ड अंपायरने नॉट आऊट दिले होते, ज्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

ट्रॅव्हिस हेडला १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आवेश खानने क्लीन बोल्ड केले. हेड आऊट होण्यापूर्वी एक मोठा वाद झाला होता.वास्तविक, एका चेंडूपूर्वी तो संजू सॅमसनने स्टंपिग आऊट केले होते. त्यानंतर हे प्रकरण थर्ड अंपायरपर्यंत पोहोचले. यावेळी रिप्लेमध्ये दिसत होते की हेडची बॅट क्रीझमध्ये नव्हती. कारण त्याची बॅट हवेतच होती. अशा परिस्थितीत थर्ड अंपायर हेडला आऊट देतील, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण थर्ड अंपायरने आश्चर्यकारकपणे हेडला नॉट आऊट घोषित केले.

खेळाडू आणि चाहत्यांना बसला धक्का –

थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे राजस्थानचे खेळाडू आश्चर्यचकित झाले. हेड नॉट आऊट आहे यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. थर्ड अंपायरच्या निर्णय पाहून राजस्थान संघाचा संचालक कुमार संगकाराही संतापला. यावेळी त्याचा संयम सुटलेला पाहिला मिळाला. सहसा शांत दिसणारा संगकारा फोर्थ अंपायरशी सीमारेषेजवळ चर्चा करताना दिसरा. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दरम्यान, पुढच्याच चेंडूवर आवेशने हेडला क्लीन बोल्ड केले. हे पाहून संगकारा पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला.

हेही वाचा – वेस्ट इंडिजच्या स्टार फलंदाजावर आयसीसीने घातली ५ वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह ७ मोठे आरोप झाले सिद्ध

अंपायरिंगवर उपस्थित केले प्रश्न –

आयपीएलच्या या हंगामाबाबत अंपायरिंगबाबत बरीच चर्चा झाली आहे. खराब अंपायरिंगमुळे संघांसह चाहत्यांनाही त्रास झाला आहे. थर्ड अंपायरने ट्रॅव्हिस हेडबाबत दिलेल्या निर्णयावर सोशल मीडियावर टीका होत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की हेड आऊट होता, पण त्याला नॉट आऊट घोषित करण्यात आले. सायमन कॅटिचनेही समालोचन करताना बॅट अजूनही हवेत असल्याचे सांगितले.

राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य –

नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक आणि हेनरिक क्लासेनच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नितीशने ४२ चेंडूंत तीन चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ७६ धावा आणि ट्रॅव्हिस हेडच्या ४४ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केलेल्या ५८ धावांच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात २०१ धावा केल्या. हैदराबादसाठी क्लासेनने १९ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून वेगवान गोलंदाज आवेश खानने दोन बळी घेतले.