Rajat Patidar Century: देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धा दमदार सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धेचा रोमांच आणखी वाढणार आहे. या स्पर्धेत दमदार कामगिरी करून खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नेतृत्व करणाऱ्या रजत पाटीदारने या स्पर्धेतील व्क्वार्टर फायनलच्या सामन्यात शतक झळकावलं आहे.
या स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघाची जबाबदारी ध्रुव जुरेलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, तो आजारी असल्याने या सामन्यात खेळू शकलेला नाही. त्याच्याजागी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडून त्याने पहिल्याच डावात दमदार शतक झळकावलं आहे.
सेंट्रल झोन संघाचा सामना नॉर्थ इस्ट झोन संघाविरूद्ध सुरू आहे. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या सेंट्रल झोन संघाला सुरूवातीलाच पहिला मोठा धक्का बसला. त्यावेळी संघाची धावसंख्या केवळ ४ होती. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रजत पाटीदारने दमदार फलंदाजी केली आणि शतक पूर्ण केलं. त्याच्या आधी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दानिश मालेवारने आधी शतक पूर्ण केलं.
रजत पाटीदारच्या या खेळीचं वैशिष्ट्ये म्हणजे, त्याने कसोटी क्रिकेटमध्येही वनडे स्टाईल आक्रमक फलंदाजी केली. ज्यावेळी तो १११ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याने अवघे ८५ चेंडू खेळून काढले होते. यादरम्यान त्याने २० चौकार आणि २ षटकार मारले होते.यादरम्यान त्याने १३० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये खूप कमी फलंदाज आहेत, जे या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतात.
रजत पाटीदारला भारतीय संघासाठी ३ कसोटी आणि १ वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र, तो वनडे आणि कसोटी संघातून बाहेर आहे. भारतासाठी खेळताना त्याने ३ कसोटी सामन्यांमध्ये ६३ धावा केल्या आहेत. तर वनडे सामन्यात त्याला २२ धावा करता आल्या आहेत.