भारतीय ऑलिम्पिक महासंघावरील (आयओए) बंदीच्या कारवाईस महासंघाचे माजी सरचिटणीस रणधीरसिंग हेच जबाबदार आहेत असा आरोप आयओएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभयसिंग चौताला यांनी केला आहे. रणधीर यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी चौताला यांनी केली आहे.
आयओएवरील बंदीच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना चौताला म्हणाले, आम्ही आयओएच्या कार्यकारिणीत ठराव करीत रणधीर यांची आयओसीवरून हकालपट्टी करावी अशी मागणीही करणार आहोत. निवडणुकीत जो काही गोंधळ झाला आहे. त्यास रणधीरसिंग हेच जबाबदार आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्रात गलिच्छपणा निर्माण करीत त्यांनी देशाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली आहे.
आयओसीने बंदीची केलेली कारवाई एकतर्फी आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आमच्या दोन प्रतिनिधींना थोडा वेळ द्यावा अशी विनंती आम्ही आयओसीकडे केली होती. मात्र त्यांनी आमची बाजू न ऐकताच हा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री जितेंद्रसिंग यांनी आयओसीचा निर्णय भारतीय क्रीडा क्षेत्राकरिता दुर्दैवी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही आयओसीला पत्र लिहिले होते तथापि त्यांनी आम्हास काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळेच आमची कोणतीही बाजू न ऐकताच निर्णय घेणे अयोग्य आहे.