इंग्लंड दौऱ्यासाठी १८ सदस्यीय महिला हॉकी संघाची घोषणा
नवी दिल्ली : आघाडीवीर राणी रामपाल हिच्याकडे २७ सप्टेंबरपासून मारलो येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
२७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या या दौऱ्यासाठी १८ जणींच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून गोलरक्षक सविता हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असेल. जपानमधील ऑलिम्पिकपूर्व तयारी हॉकी स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील सविता आणि रजनी इथिमारपू यांनी आपले स्थान कायम राखले आहे.
बचावपटू दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रीना खोखार आणि सलिमा टेटे यांनीही स्थान मिळवले आहे. मधल्या फळीत अनुभवी नमिता टोप्पो हिने दुखापतीनंतर बऱ्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन केले आहे.
भारतीय महिला हॉकी संघ
गोलरक्षक : सविता, रंजनी इथिमारपू, बचावफळी : दीप ग्रेस इक्का, गुरजित कौर, रीना खोखार, सलिमा टेटे, मधली फळी : सुशीला चानू पुखारमबम, निक्की प्रधान, मोनिका, नेहा गोयल, लिलिमा मिंझ, नमिता टोप्पो, आघाडीची फळी : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामी, नवज्योत कौर, शर्मिला देवी.
युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समन्वय राखत आम्ही टोक्यो ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवले आहे. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर नमिता टोप्पो संघात परतली आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी १० दिवसांचे सराव शिबीर होणार आहे. या सामन्यांमुळे आम्हाला भुवनेश्वर येथे होणाऱ्या ‘एफआयएच’ हॉकी ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी चांगला सराव करता येईल. – शोर्ड मरिन, भारताचे मुख्य प्रशिक्षक