सलामीवीर अखिल हेरवाडकरच्या शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत झारखंडविरुद्धच्या पहिल्या दिवशी ६ बाद ३०३ अशी मजल मारली आहे.
अभिषेक नायरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच या हंगामात खेळणाऱ्या मुंबईने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईला २१ धावांवर पहिलाच धक्का बसला, तरी अखिल आणि श्रेयस अय्यर (४५) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. श्रेयस बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवने ७० चेंडूंमध्ये ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ७५ धावांची खेळी साकारत संघाची धावगती वाढवली. अखिलने एका बाजूने संघाचा धावफलक हलता ठेवत १२ चौकारांसह १०७ धावांची दमदार खेळी साकारली. झारखंडकडून जसकरन सिंग आणि कर्णधार शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.